१५ सप्टेंबरपर्यंत लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण न दिल्यास आंदोलन करू ! – पंचमसाली पिठाचे स्वामी बसव जय मृत्युंजय यांची चेतावणी
स्वातंत्र्यानंतर केवळ १० वर्षे आरक्षण देण्यात यावे, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. हे सूत्र सर्वांनीच लक्षात घेणे आवश्यक !
कलबुर्गी (कर्नाटक) – येथील पंचमसाली पिठाचे स्वामी बसव जय मृत्युंजय यांनी १५ सप्टेंबरपर्यंत लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याची मागणी राज्यशासनाकडे केली आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर १ ऑक्टोबरपासून ते सत्याग्रह चालू करतील, अशी त्यांनी चेतावणी दिली आहे.
मृत्युंजय स्वामी यांनी सांगितले की, या मागणीसाठी याच वर्षी जानेवारी मासामध्ये आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ‘१५ सप्टेंबरपूर्वी आरक्षण देऊ’, असे आश्वासन दिले होते. त्या वेळी सध्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही समर्थन दिले होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री बोम्मई यांना विनंती करतो की, त्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत आरक्षण देण्याची घोषणा करावी.