सचिन वाझे यांना मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात भरती केले !
मुंबई – अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने चांगल्या उपचारांसाठी मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर अँजिओग्राफी, तसेच गरज पडल्यास ओपन हार्ट शस्त्रकर्म केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या अधिवक्त्यांनी दिली. सचिन वाझे गेले काही दिवस भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती. कारागृहात वाझे यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याने वाझे यांच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी न्यायालयाकडून अनुमती मागितली होती. त्यानंतर त्यांना भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.