साधकांना क्षणोक्षणी घडवणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !
१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी एका प्रसंगातून ‘दिसेल ते कर्तव्य’, याप्रमाणे प्रत्येक कृती करायला हवी’, याची जाणीव करून देणे
‘एकदा सद्गुरु राजेंद्रदादा देवद आश्रमातील स्वयंपाकघरात आले होते. तेव्हा मी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासाठी स्वयंपाक करत होते. स्वयंपाकघरात काही अनावश्यक साहित्य ठेवले होते. मी ते साहित्य बघितले आणि त्याकडे दुर्लक्ष केले. ‘ज्यांनी साहित्य ठेवले असेल, ते उचलतील’, असा मी विचार केला. त्या वेळी ‘कुणीही साहित्य ठेवले असले, तरी मी ते योग्य ठिकाणी ठेवायला हवे’, अशी आपली वृत्ती बनायला हवी’, याची सद्गुरु दादांनी मला जाणीव करून दिली. त्या वेळी ‘दिसेल ते कर्तव्य’, अशी आपली वृत्ती बनायला हवी’, याची मला जाणीव झाली.
२. कोणत्याही गोष्टीचा कर्तेपणा न घेणारे सद्गुरु राजेंद्रदादा !
एकदा सद्गुरु दादा बाहेर होते आणि भ्रमणभाषवरून आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेत होते. भावप्रयोग झाल्यानंतर आम्ही गोलाकार बसलो. त्या वेळी सद्गुरु दादा क्रमाने आमचे प्रत्येकाचे नाव घेऊन ‘आता तुम्ही केलेले प्रयत्न सांगा’, असे सांगत होते. तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले; कारण ‘आम्ही कोणत्या क्रमाने बसलो आहोत’, हे त्यांना ठाऊक नव्हते, तरी ते सर्वांची अचूकपणे त्याच क्रमाने नावे घेऊन विचारत होते. याविषयी आम्ही त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला ही अनुभूती आली.’’ त्या वेळी ‘सद्गुरु स्वतःकडे कर्तेपण कसे घेत नाहीत’, हे माझ्या लक्षात आले.
३. दाढ दुखत असतांना ‘परम पूज्य, परम पूज्य’ अशी हाक मारल्यावर सद्गुरु राजेंद्रदादांचा तोंडवळा दिसणे
२०.३.२०२१ या दिवशी माझी दाढ दुखत असल्याने मी पनवेलच्या एका रुग्णालयात गेले होते. दंतवैद्य ती दाढ स्वच्छ करत असतांना मला पुष्कळ त्रास होत होता. त्यामुळे मी ‘परम पूज्य, परम पूज्य’ अशी हाक मारत होते. त्या वेळी मला सद्गुरु दादांचा तोंडवळा दिसत होता. आमच्यासाठी ‘सद्गुरु दादा परम पूज्यच आहेत’, असे मला वाटले. त्यानंतर मला दाढेचा त्रास झाला नाही.’
– कु. वैशाली बांदिवडेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(२४.३.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |