येत्या ३ वर्षांत विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करा, अन्यथा स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक यांना तंबी !
नागपूर – ‘येत्या ३ वर्षांत विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करून दाखवावे. उद्दिष्ट पूर्ण केले, तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक यांना तंबी दिली आहे. येथे महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाच्या पशू रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राज्याचे पशूसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार उपस्थित होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक यांनी येत्या ३ वर्षांत विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करून दाखवावे. त्यासाठी चांगल्या प्रतीच्या गायींची शृंखला निर्माण करावी. जर तुम्ही हे करून दाखवले, तर तुमचा सातवा वेतन आयोग आणि पदोन्नती होईल; मात्र त्यांनी हे करू शकले नाही, तर आधीच जनता ज्या विद्यापिठाला ‘पांढरा हत्ती’ म्हणते, त्या ‘पांढर्या हत्ती’ची आम्हाला आवश्यकता नाही. या नव्या रुग्णालयात वर्षाकाठी किती शस्त्रक्रिया करणार ? किती प्राण्यांवर उपचार करणार ? अधिक दूध देणार्या किती गायी सिद्ध करणार ? याची आकडेवारी त्यांनी द्यावी.