शेतकर्यांनी पिकांची नोंद करण्यासाठी ‘ई-पीकपहाणी ॲप’ सुविधेचा लाभ घ्यावा ! – अजय पाटणे, तहसीलदार, मालवण
मालवण – शेतकर्यांना त्यांनी स्वत:च्या भूमीत घेतलेल्या पिकांची नोंद करता यावी, यासाठी शासनाने ‘ई-पीकपहाणी ॲप’ विकसित केले आहे. शेतकर्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि पिकांची नोंद स्वत:च ॲपद्वारे करावी, असे आवाहन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या तालुक्यातील तळगाव या मूळ गावी तहसीलदार अजय पाटणे यांनी त्यांची भेट घेतली, तसेच त्यांना ‘ई-पिकपहाणी ॲप’ची माहिती दिली. या वेळी खासदार राऊत यांनी स्वत: ॲपमध्ये त्यांच्या भूमीत घेतलेल्या पिकांची नोंद केली. त्यानंतर त्यांनी ‘शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा’, असे आवाहनही केले.
शेतकर्यांनी घेतलेल्या पिकांची नोंद यापूर्वी तलाठ्यांच्या माध्यमातून केली जात असे; मात्र आता त्यांना तलाठ्यावर अवलंबून रहाण्याची आवश्यकता नाही. शेतकर्यांनी ‘प्ले स्टोअर’मध्ये जाऊन हे ॲप ‘डाऊनलोड’ करावे. ज्या ठिकाणी भ्रमणभाषला ‘रेंज’ नाही, तेथेही या ॲपमध्ये माहिती भरता येणार आहे. त्यानंतर रेंजमध्ये आल्यावर ही माहिती अद्ययावत (अपडेट) होणार आहे. माहिती ‘अपडेट’ केल्यानंतर तलाठी पहाणी करतील अन् नंतर त्याला संमती मिळणार आहे.