‘सहजता, निरपेक्षता आणि समष्टी भाव’ या गुणांचा संगम असलेले अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रतिरूप असलेले सद्गुरु राजेंद्र शिंदे !
भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या साधिका कु. स्वाती शिंदे यांना सद्गुरु राजेंद्रदादा यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. सहजता
१ अ. बालसाधिकेला स्वयंपाक घरातील दूध देतांना सहजतेने सर्व कृती करणारे सद्गुरु राजेंद्रदादा ! : एके दिवशी रात्री १० वाजता एका बालसाधिकेला स्वयंपाकघरातून दूध घ्यायचे होते. तेव्हा तेथे अन्य साधक नव्हते. त्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादांनी स्वतःहून शीतकपाटातील दूध बाहेर काढले आणि दुधात साखर घालून चमच्याने ढवळून त्या बालसाधिकेला दूध दिले. या सर्व कृती सद्गुरु राजेंद्रदादा सहजतेने करत होते. त्यांच्या वागण्यात सद्गुरुपदाचा कुठे लवलेशही नव्हता. ते नेहमीच सहजावस्थेत असतात.
१ आ. भांडी घासण्याची सेवा करणार्या साधिकेला सद्गुरु राजेंद्रदादांनी भांडी विसळण्यासाठी साहाय्य करणे : एकदा एक साधिका (काकू) भांडी घासण्याची सेवा करत होत्या आणि त्यांना पुष्कळ भांडी घासायची होती. ते पाहिल्यावर सद्गुरु राजेंद्रदादांनी लगेच त्यांना भांडी विसळायला साहाय्य केले. हे सर्व पाहून ‘कृष्ण जसा सर्वांना साहाय्यासाठी धावून येतो, तसे सद्गुरु राजेंद्रदादा सर्वांना साहाय्य करण्यासाठी येतात’, असे मला वाटले. ते पुष्कळ आनंदाने ही कृती करत होते.
२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
२ अ. जिन्यातील केर काढण्याची सेवा करतांना अंगदुखी आणि थकवा यांमुळे सेवा करणे कठीण होणे; मात्र सद्गुरु राजेंद्रदादांच्या खोलीबाहेर त्यांचे दर्शन झाल्यावर त्रास न्यून होऊन उत्साहाने सेवा होऊ लागणे : काही दिवस माझ्याकडे सद्गुरु राजेंद्रदादा रहात असलेल्या इमारतीतील केर काढण्याची सेवा होती. एकदा मला जिन्यातील केर काढतांना पुष्कळ त्रास होत होता. मला अंगदुखी आणि थकवाही जाणवत होता. त्या वेळी ‘प्रभु श्रीराम येणार आहे; म्हणून शबरीने जसा भाव ठेवून सिद्धता केली’, तसा आपण भाव ठेवूया’, असा विचार करून मी केर काढू लागले. मी केर काढत पहिल्या माळ्यावर पोचेपर्यंत मला पुष्कळ थकवा आला होता. ‘आता येथून पुढे केर काढणे शक्य होणार नाही’, असे मला वाटत होते. मी केर काढत सद्गुरु राजेंद्रदादांच्या खोलीच्या बाहेरील मार्गिकेत आले आणि त्याच वेळी सद्गुरु दादा त्यांच्या खोलीतून बाहेर आले. तेव्हा मला त्यांच्याकडून चैतन्य आणि शक्ती मिळाली अन् नंतर उत्साह वाटून मी आनंदाने जिन्यातील केर काढला. पुढे असे प्रतिदिनच होऊ लागले. सद्गुरु दादांच्या चैतन्यमय अस्तित्वाने अनेक दिवस मी ही सेवा करू शकले.
२ आ. मला आध्यात्मिक त्रास होत असतांना काही सुचत नसल्यास मी सद्गुरु राजेंद्रदादांशी थोडे बोलते. त्यानंतर मला नामजपादी उपाय केल्यावर सकारात्मक राहून सेवा आणि साधना करता येते.
२ इ. श्रीकृष्णाची आठवण आल्यावर सद्गुरु राजेंद्रदादा श्रीकृष्णरूपात येऊन बोलतांना अनुभवणे : मी भावस्थितीत असतांना मला श्रीकृष्णाची आठवण आल्यास ‘सद्गुरु राजेंद्रदादा श्रीकृष्णाच्या रूपात येऊन माझ्याशी बोलतात’, असे मला अनुभवायला येते. त्या वेळी ‘गुरुदेवांचे या क्षुद्र जिवावर किती लक्ष आहे’, हे लक्षात येते.
३. देवद आश्रमातील साधकांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून मिळत असलेला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग
अ. ‘परात्पर गुरुदेव, आपणच सद्गुरु राजेंद्रदादांच्या रूपात, ‘कृष्ण’ रूपात आणि ‘गुरु’ रूपात येऊन आम्हा जिवांवर प्रीतीचा वर्षाव करत असता.
आ. परात्पर गुरुदेव, आपण आम्हा साधकांना सद्गुरु राजेंद्रदादांच्या माध्यमातून प्रतिदिन भेटता आणि प्रेम देता’, असे आम्हाला सतत अनुभवायला येते.
इ. परात्पर गुरुदेव, मला तुमची पुष्कळ आठवण आल्यावर मला सद्गुरु राजेंद्रदादांचे दर्शन होते आणि त्यांच्याशी बोलल्यावर तुम्हीच भेटल्याचा आनंद होतो. माझे मन भरून येते.’
कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, सद्गुरु राजेंद्रदादा आपलेच प्रतिरूप आहेत. त्यांना तीव्र शारीरिक त्रास आणि वेदना होऊनही ते सतत आनंदी अन् उत्साही असतात. ते आम्हा साधकांना त्रास आणि प्रसंग यांतून बाहेर पडण्यासाठी शक्ती देतात. मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. सद्गुरु राजेंद्रदादा साधकांना सहजतेने घडवत असतात. ते साधकांना चुकांची जाणीव करून देतात. त्यामुळे ‘स्वतःकडून चुका होऊ नयेत’, यासाठी साधकांकडून प्रयत्न होतात.
परात्पर गुरुदेव, कधी कधी असे वाटते की, ‘तुम्ही घडवलेले संत आणि सद्गुरु देवच आहेत. आपण तर महाविष्णु आहात, कृपेचा आणि प्रीतीचा महासागर आहात. परात्पर गुरुदेव, आपल्याला ओळखणे महाकठीण आहे. तुमची स्तुती करायला शब्दच अपुरे पडतात. आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
प्रार्थना : ‘परात्पर गुरुदेव, आपण देवद आश्रमातील साधकांना सद्गुरु राजेंद्रदादांचा सत्संग मिळवून दिला. ‘त्यांच्या सत्संगाचा आम्हाला आध्यात्मिक दृष्टीने लाभ करून घेता येऊ दे’, ही कळकळीची प्रार्थना !
– कु. स्वाती बाळकृष्ण शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.७.२०२१)
|