देशात सर्वाधिक पाऊस कोयना विभागात, चेरापुंजीलाही टाकले मागे !
नवजा आणि वलवण पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद
सातारा, १३ सप्टेंबर (वार्ता.) – वर्ष २०२१ मधील पावसाने नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. महाबळेश्वरला मागे टाकत नवजा आणि वलवण पाणलोट क्षेत्रात १०० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे या क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. चेरापुंजीसह देशातील ४ ठिकाणांवर सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्यांतील ३ ठिकाणे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोयना विभागात देशातील सर्वाधिक पाऊस झाला असून चेरापुंजीलाही मागे टाकले आहे.
१ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत नवजामध्ये ५ सहस्र १५८ मिलिमीटर, वलवण येथे ५ सहस्र ९१४ मिलिमीटर आणि वाई येथील जोर येथे ६ सहस्र ५२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच कालावधीमध्ये महाबळेश्वर येथे ५ सहस्र १५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणामध्ये १०० टी.एम्.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची क्षमता १०५.२५ टी.एम्.सी. एवढी आहे.