पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्या विसर्जन हौदांवर लाखो रुपयांचा खर्च !
विसर्जनाचे दिवस ४ आणि हौदांसाठी खर्च ११ दिवसांचा !
- ४ दिवसांसाठी विसर्जन हौदांची आवश्यकता असतांना ११ दिवसांचा खर्च का केला जातो ? या निर्णयप्रक्रियेवर कुणाचा अंकुष कसा नाही ? अनाठायी पैसे खर्च करणार्यांकडूनच पैसे वसूल करायला हवेत. – संपादक
- श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करू दिले असते, तर एक रुपयाही खर्च येणार नाही आणि धर्मशास्त्रानुसार विसर्जन झाल्यामुळे त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे. – संपादक
पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा नागरिकांना देण्याचे घोषित केले होते. गणेशोत्सवात दीड, पाच, सात आणि अनंतचतुर्दशी हे चारच दिवस विसर्जनाचे असतात; मात्र महापालिकेने ११ दिवसांसाठी हौद घेतले असून त्यासाठी १ कोटी २६ लाख १९ सहस्त्र ८६० रुपये ठेकेदाराला दिले जाणार आहेत. ४ दिवसांसाठी ही निविदा काढली असती, तर विसर्जनाचा खर्च ४६ लाख रुपये इतका होता. त्यामुळे अतिरिक्त ७ दिवसांसाठी ८० लाख ३० सहस्त्र ८२० रुपये ज्यादा खर्च मोजावा लागणार आहे. दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी ६० पैकी निम्म्या गाड्या कात्रज तलाव येथेच असल्याने विसर्जनाची सर्व व्यवस्था कोलमडून गेली होती. (६० वाहनांना ११ दिवसांसाठी प्रत्येकी २ लाख १० सहस्त्र ३२१ रुपये, असा दर एका आस्थापनाने दिला असून तो दर सर्वांत अल्प असल्याने घनकचरा विभागाने त्यास मान्यता दिली आहे.) या गाड्यांना प्रतिदिन १२ घंट्यांसाठी १ सहस्र ५९३ रुपये प्रतिघंटा भाडे दिले जाणार आहे.