निरागस, आनंदी, नम्र आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणारे पुणे येथील पू. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) !
पुणे येथील पू. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) गेल्या १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. ते ‘प्रथम श्रेणी अधिकारी’ (क्लास वन ऑफिसर) म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत; पण या गोष्टींचा त्यांना अहं नाही. ते अत्यंत नम्र आहेत. आतापर्यंत त्यांनी ‘ग्रंथप्रदर्शन आणि वितरण कक्ष लावणे, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे’ इत्यादी सेवा केल्या आहेत. उतारवयातही त्यांचा सेवा करण्याचा उत्साह ‘तरुणांना लाजवेल’, असा आहे. उतारवयात त्यांची तीन शस्त्रकर्मे झाली; पण त्या वेळीही गुरुदेवांवरील श्रद्धेच्या बळावर ते स्थिर होते. त्यांच्याविषयी त्यांची मुलगी, नात आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
सौ. मानसी आगाशे (धाकटी मुलगी), चिंचवड, पुणे.
१. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा
अ. ‘बाबा नेहमी धुऊन इस्त्री केलेले कपडे वापरतात.
आ. ‘जेवणाचे पटल आणि ओटा आवरून ठेवणे, बाहेरून आणलेला खाऊ डब्यात भरून ठेवणे’, या सर्व गोष्टी ते व्यवस्थितपणे करतात.
इ. बाबांनी अधिकोषाची कागदपत्रे आणि विजेची देयके वेगवेगळ्या ‘फोल्डर’मध्ये व्यवस्थित लावून कपाटाच्या खणात ठेवली आहेत.
२. नम्रता
ते सरकारी नोकरीतून मोठ्या पदावरून निवृत्त झाले आहेत, तरी ते घरी किंवा नातेवाइकांशी नम्रतेने आणि प्रेमाने बोलतात.
३. प्रेमभाव
अ. जावई आणि नातवंडे घरी आली की, बाबा त्यांना त्यांच्या आवडीचा खाऊ आणून देतात.
आ. घरी आलेल्या व्यक्तीला ते खाऊ किंवा चहा दिल्याविना परत जाऊ देत नाहीत.
४. स्वतः आनंदी असणे आणि इतरांनाही आनंद देणे
बाबा बोलतांना मध्ये मध्ये समर्पक विनोद करतात. त्यामुळे आमच्या मनावरील ताण निघून जातो. बाबा स्वतः नेहमी आनंदी असतात आणि दुसर्यालाही हसवून आनंद देतात.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘जीवनाच्या प्रत्येक वळणावर साधनेचा दृष्टीकोन देणारे आई-बाबा आम्हाला लाभले’, यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘त्यांच्यासारखे गुण आम्हाला आमच्यात आणता यावेत’, ही गुरुचरणी प्रार्थना आहे.
६. वडील संत होण्याच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना
अ. बाबांच्या समवेत रुग्णालयात असतांना माझ्याकडून परात्पर गुरुदेवांना ‘मी संतांची सेवा करत आहे’, असा माझा भाव असू दे’, अशी प्रार्थना झाली.
आ. आताही ‘ती. बाबा’, असे लिहित असतांना मला ‘पू. बाबा’, असे लिहावे’, असे वाटत होते.’
कु. यशश्री देशपांडे (नात, मोठ्या मुलीची मुलगी, वय २३ वर्षे)
१. प्रेमळ
‘मी जेव्हा कधी आजी-आजोबांकडे जाते, तेव्हा आजोबा नेहमी प्रेमाने मला ‘खाऊ हवा का ?’, असे विचारतात. घरी जो खाऊ असेल, तो खाऊ ते मला देतात. ते अगदी आपुलकीने आमची विचारपूस करतात.
२. मला किंवा आईला कधी कशाचे वाईट वाटत असेल, तर आजोबा आम्हाला अगदी साधा निखळ विनोद सांगतात. तो ऐकून आमचे मन लगेच हलके होते.
३. ते मला सांगतात, ‘‘मन लावून अभ्यास कर. काही काळजी करू नकोस. श्रीकृष्ण नेहमी तुझ्या पाठीशी आहे.’’ त्यामुळे माझे मन सकारात्मक होते.
नेहमी साधनेचा दृष्टीकोन देऊन ‘आयुष्यात प्रगती कशी करता येईल ?’, हे शिकवणारे आजोबा मला मिळाले’, यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
पुणे येथील सर्व साधक
‘काका मनाने निर्मळ, निरागस आहेत. ते सतत बालकभावात असतात’, असे आम्हाला जाणवते.’
सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)
१. ‘मार्च २०२० पर्यंत, म्हणजे दळणवळण बंदी लागू होण्यापूर्वीपर्यंत साठेकाकांची बाहेर जाऊन जिज्ञासूंना संपर्क करण्याची सिद्धता असायची. ते ती सेवा करायचे.
२. ‘पूरग्रस्तांसाठी असलेली भूमी (प्लॉट) मिळाल्यामुळे स्वतःचे घर झाले’, याविषयी त्यांना देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.
३. गुरुपौर्णिमेच्या आधी त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना मला त्यांच्या आवाजात पुष्कळ आनंदाची स्पंदने जाणवली. मला त्यांचा आवाज लहान बालकाप्रमाणे निरागस आणि निर्मळ जाणवला. ‘त्यांना कुठलीच अपेक्षा नाही’, असेही मला जाणवले.
‘असे दैवी गुण असलेले काका लवकरच संतपदी विराजमान होवोत’, अशी प.पू. गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’ (२९ ऑगस्ट २०२१ या दिवशी पू. गजानन साठे यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. – संकलक)
श्री. रवींद्र गोंधळेकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि सौ. राजश्री गोंधळेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)
१. ‘साठेकाका प्रसाराच्या सेवेला जातांना वेळेचे बंधन पाळतात.
२. एखादी सेवा मिळाली की, ‘ती लवकरात लवकर पूर्ण कशी होईल ?’, यासाठी त्यांची धडपड असते.
३. त्यांची प.पू. गुरुमाऊलींवर फार श्रद्धा आहे. ते सातत्याने गुरुदेवांचे स्मरण करतात.
४. त्यांच्याकडे पाहिल्यावरही त्यांच्याविषयी आदरभाव वाटतो.
५. दळणवळण बंदीमुळे मागील दीड वर्षापासून माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नाही; परंतु ‘त्यांची लवकर प्रगती होईल. त्यांची निश्चितच संतपदाकडे वाटचाल होत आहे’, असे मला जाणवत आहे.’
श्री. विजय बोरामणीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)
१. ‘काका मनाने निर्मळ आणि प्रेमळ आहेत. साधक त्यांच्या घरी आल्यावर त्यांना फार आनंद होतो. ते आमच्या घरी आल्यावर सगळ्यांची विचारपूस करतात.
२. आम्ही ‘अर्पण गोळा करणे आणि जिज्ञासूंना संपर्क करणे’, या सेवा करण्यासाठी समवेत जायचो. तेव्हा सेवा संपल्यावर ते त्या ठिकाणापासून मला जवळच्या बस थांब्यापर्यंत त्यांच्या दुचाकीने सोडत असत.’
सौ. प्रतिभा फलफले
१. ‘काका सतत आनंदी असतात.
२. त्यांचे वय अधिक असून ते रुग्णाईत असतांनाही कुठलीही मर्यादा न ठेवता झोकून देऊन आणि तळमळीने सेवा करतात.’
सौ. राजश्री खोल्लम
१. ‘दोन वर्षांपूर्वी काकांची मुलगी आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अश्विनी देशपांडे हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली. त्या वेळी मनोगत व्यक्त करतांना काकांनी त्याचे सर्व श्रेय परात्पर गुरुदेवांना दिले.
२. काकांचे आताचे छायाचित्र पाहिल्यावर ‘ते सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले आणि आनंद जाणवला.
३. त्यांच्या तोंडवळ्यावर निरागसता आणि तेजही जाणवते.
४. काका सर्वांमध्ये मिसळतात, तरी ते अलिप्तही असतात.’
(या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक – ऑगस्ट २०२१)
(‘हे लिखाण पू. गजानन साठे संत होण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख ‘पूजनीय’ असा केलेला नाही.’ – संकलक)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |