संतपीठ व्हावे !
संपादकीय
संतपिठांमध्ये समाजाची जडणघडण करणार्या संतांची निर्मिती व्हावी, ही हिंदूंची अपेक्षा !
पैठण नगरीतील ‘संतपीठ’ या शैक्षणिक वर्षातच चालू होणार, अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ही घोषणा हिंदूंना आश्वस्त करणारी आहे. ‘भारतीय परंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करणे’, ‘सामाजिक मूल्ये अन् संस्कार यांची समाजात निर्मिती करणे’, तसेच ‘सांप्रदायिक कलांचा अभ्यास करणे’, अशी अनेक उद्दिष्टे हे संतपीठ चालू करण्यामागे आहेत. संत चरित्र किंवा संत साहित्य हे व्यक्तीच्या जीवनाला आकार देते. कठीण प्रसंगांना कसे सामोरे जायचे ? आणि त्याहून अधिक प्रत्येक संकटावर भक्तीच्या जोरावर कशी मात करायची ? हे संत साहित्यातून आपल्याला शिकायला मिळते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि सर्वत्र अनिश्चित वातावरण असतांना जनतेला संत साहित्यातून फार मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे अशा साहित्याच्या अभ्यासाची सोय उपलब्ध करून देणे, हा सरकारचा कौतुकास्पद निर्णय आहे. असे असले, तरी संत साहित्य हे इतर साहित्याप्रमाणे केवळ रसग्रहण करण्यासाठी किंवा आवड म्हणून वाचायचे नसते. विविध संतांनी कशी साधना केली ? ईश्वरप्राप्तीसाठी काय प्रयत्न केले ? हे जाणून ते कृतीत आणणे आवश्यक आहे. हल्ली संत साहित्याचा अभ्यास करणारे बरेच जण मिळतात. बर्याच जणांनी संत साहित्यावर पी.एच्.डी. केलेली असते. त्यांनी ज्या संतांचे साहित्य पी.एच्.डी. करण्यासाठी निवडलेले असते, त्याविषयी अनेक लहान-मोठी सूत्रे, त्यामागील पार्श्वभूमी त्यांना ठाऊक असते; मात्र त्या साहित्यात सांगितल्याप्रमाणे किती सूत्रे आचरणात आणली, याविषयी मात्र त्यांची पाटी कोरी असते. हल्लीच्या शिक्षणपद्धतीमधील ही एक त्रुटी म्हणता येईल. संतांच्या साहित्याचा अभ्यास केवळ पदवी मिळण्यासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यापुरता मर्यादित नाही, हे आपल्या व्यवस्थेच्या लक्षात येत नाही. त्यामुळे संत साहित्याचा अभ्यास करणार्या संतपिठाची निर्मिती होते; मात्र संत घडवणार्या पिठाची निर्मिती होत नाही.
भारत आध्यात्मिक भूमी आहे; मात्र सध्याच्या शिक्षणपद्धतीमुळे संतांचे महत्त्व आपल्या समाजाला कळलेले नाही. पुस्तकी ज्ञानापेक्षा आत्मज्ञानाने मनुष्याचा उद्धार होतो, हे सूत्रच आजचा समाज विसरला आहे. त्यामुळे संत साहित्य किंवा हिंदूंचे धर्मग्रंथ यांचा एका ठराविक मर्यादेपर्यंत विचार केला जातो. त्यामुळे ग्रंथातील अभंग किंवा ओव्या शिकवल्या जातात; मात्र त्या कशा आचरणात आणायच्या असतात, याचे ज्ञान बहुतांश प्राध्यापकांना नसते आणि ते शिकणार्या बहुतांश विद्यार्थ्यांनाही ते जाणून घेण्याची इच्छा नसते. या सर्व गोष्टींचा विचार करता संतपिठांची निर्मिती होणे आवश्यकच आहे; मात्र त्याचे स्वरूप आध्यात्मिक स्तरावर असावे. संतपिठांमध्ये अशा प्रकारे संत साहित्याचा अभ्यास व्हावा की, ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक परिवर्तन होईल आणि असा विद्यार्थी समाजालाही साधनेच्या मार्गाला लावेल. असे झाले, तरच संतपिठांची खर्या अर्थाने फलनिष्पत्ती निघाली, असे म्हणता येईल.