स्वातंत्र्यलढ्याला दिशा देण्यासह ‘प्रबुद्ध (विद्वान) समाजच स्वातंत्र्य टिकवू शकतो’, ही दूरदृष्टी ठेवून लोकमान्य टिळक यांनी चालू केलेला ‘गणेशोत्सव’ आणि प्रगल्भ नेतृत्वाच्या अभावी आजच्या सण-उत्सवांना प्राप्त झालेले विकृत स्वरूप !
सण-उत्सवांमध्ये वाढत असलेले गैरप्रकार आणि विकृती रोखण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक
‘सण आणि उत्सव हे कुठल्याही समाजाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब असतात. भारत हा एक अतीप्राचीन देश आहे. भारतात संस्कृत भाषा न्यूनतम २५०० वर्षांपासून प्रचलित असून संस्कृतमध्ये प्रचंड साहित्य निर्माण केले गेले आहे. या साहित्यांमध्ये आपले सण आणि उत्सव यांची माहिती अन् वर्णने शोधता येतात; पण तो अभ्यासाचा विषय असतो. आपण एखादा सण किंवा उत्सव साजरा करतो, तो परंपरेने आपल्यापर्यंत आलेला असतो; म्हणून साजरा करतो. आपले अनेक सण आणि त्या वेळी होणारे उत्सव यांचा कुठेतरी निसर्गाशी संबंध असतो.
१. सणांचे व्यावसायीकरण आणि राजकीयीकरण होऊन परंपरा अन् संस्कृती यांच्या नावाखाली हिडीस अन् विकृत प्रथा रुजू लागलेल्या असणे
आज या सणांचे मूळ स्वरूप पालटून त्यांचे व्यावसायीकरण आणि राजकीयीकरण झाले आहे. या सणांच्या इतिहासामध्ये डोकावून पाहिले, तर २५-३० वर्षांपूर्वीही हे सण आपण अशा प्रकारे साजरे करत नव्हतो. परंपरा आणि संस्कृती यांच्या नावाखाली एक अत्यंत हिडीस अन् विकृत प्रथा रुजू लागली आहे. ही विकृती अशीच चालू राहिली, तर कालांतराने त्यावर ‘परंपरा आणि प्रथा’ यांचे शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे याची गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक आहे.
२. सण साजरे करण्याचा मूळ उद्देश हरवल्याने कित्येक कुटुंबांत एक परंपरा किंवा प्रथा म्हणून सण साजरे केले जाणे आणि सार्वजनिक उत्सव साजरे करणार्यांना विवेकी अन् प्रगल्भ नेतृत्व न लाभणे
बहुतेक सण किंवा उत्सव हे जरी धर्माच्या चौकटीत बसवले असले, तरी त्याला एक समाजशास्त्रीय असा महत्त्वाचा आशय असतो. आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्या रहाणीमानामध्ये इतके मोठे पालट झाले असल्यामुळे आज अनेक सणांचा आशय हरवला आहे. कित्येक कुटुंबांमधून एक परंपरा किंवा प्रथा म्हणूनच आज ते साजरे केले जात आहेत. कुटुंबाला एकत्र आणण्याचा उद्देश मात्र यातून नक्की साध्य होतो. हे जरी खरे असले, तरी आज सण साजरे करतांना लोक सहस्रोंच्या संख्येने सामील होतात. या निमित्ताने नाच-गाणी होतात आणि मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषणही होते ! हे सर्व करतांना ‘आपले कुठेतरी चुकत आहे’, हेही कदाचित् त्यांच्या लक्षात येत नसेल. या सण आणि उत्सव यांच्या सार्वत्रिकीकरणाचे नेतृत्व आज संपूर्णतया धटींगणांच्या हातात गेले आहे. समाजाने आपले सारासार विवेकी आणि प्रगल्भ नेतृत्व हरवले आहे का ? अशा नेतृत्वाच्या निर्मितीसाठी हवी असलेली सामाजिक परिस्थिती आज महाराष्ट्राने गमावली आहे का ?
३. ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रबुद्ध (विद्वान) आणि प्रगल्भ समाजच स्वातंत्र्य टिकवू शकतो’, ही दूरदृष्टी ठेवून लोकमान्य टिळक यांनी ‘गणेशोत्सव’ अन् ‘शिवजयंती’ मोठ्या प्रमाणात चालू करणे
लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांचे सार्वत्रिकीकरण केले. त्यांचा तत्कालीन संदर्भ आपण स्वातंत्र्यलढ्याशी जोडतो. गणेशोत्सवामुळे लोक एकत्र येतात. त्यांच्या पुढे केलेल्या भाषणांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याला दिशा देण्याचे काम करता येणे शक्य होते. हा हेतू त्यात नक्कीच होता; पण तो तेवढ्यापुरताच सीमित होता का ? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे काय ? प्रबुद्ध (विद्वान) आणि प्रगल्भ समाजच स्वातंत्र्य टिकवू शकतो. ‘उत्सव हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम होऊ शकते’, हा लोकमान्य टिळकांचा दृष्टीकोन नक्कीच होता. गणेशोत्सवाला सार्वजनिक करण्यामागे टिळकांचा हाही हेतू होता.
४. ‘शिवजयंती’च्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुजाण आणि विवेकी समाज निर्माण करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे कार्य केले’, या कार्याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे !
टिळकांचे दैनिक ‘केसरी’मधील काही अग्रलेख आणि इतर वाङ्मय यांचा अभ्यास केला, तर ‘गणपतीची, म्हणजे बुद्धीच्या देवतेची निवड त्यांनी का केली असावी ?’, याचे उत्तर आपल्याला नक्कीच शोधता येते. तोच प्रश्न शिवजयंतीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. निवडक मावळ्यांची सेना निर्माण करून गनिमी काव्याने त्यांनी औरंगजेबाचे मोगली आक्रमण दक्षिणेकडे थांबवले; पण छत्रपती शिवाजी महाराज यांनाही अभिप्रेत असलेला सुजाण आणि विवेकी समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांकडे आपण फारसे लक्ष देत नाही. लढाई जिंकणे एक वेळ सोपे असते; पण ‘प्रगल्भ समाजाची निर्मिती’ ही गोष्ट सोपी नसते. त्याची आयुधे वेगळी असतात.
५. पाश्चात्त्यांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण न करता त्यांचा चंगळवाद स्वीकारणारे भारतीय !
पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये असलेला सारासार विवेक, संशोधन वृत्ती अन् तारतम्य या कशाचाच स्वीकार न करता आपण मात्र केवळ त्यांचा चंगळवाद घेत आहोत.
६. आजच्या उत्सवांनी जे रूप धारण केले आहे, ते आत्मघातकी आणि अभिरुचीहीन समाज निर्माण करणारे असणे
दुर्दैवाने संस्कृती आणि परंपरा यांच्या रक्षणाच्या नावाखाली आजच्या दहीहंडी अन् गणेशोत्सव यांनी जे रूप धारण केले आहे, ते आत्मघातकी आणि अभिरुचीहीन समाज निर्माण करणारे आहे. सृजनात्मक (नवनिर्मितीची), तसेच भरीव आणि रेखीव कार्य करण्याची क्षमता हरवलेला समाज यातून निर्माण होत आहे. परंपरेच्या नावाखाली आज लोकमान्यांच्या मूळ हेतूच्या विरुद्ध गोष्टी होत आहेत.
अ. वर्ष २०१८ मध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी ३५-४० जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला.
आ. दहीहंडीच्या वेळी दिल्या जाणार्या पारितोषिकांपासून गणपतीच्या मंडपांसाठी आपण प्रतिवर्षी अक्षरशः सहस्रो कोटी रुपये व्यय करत आहोत. तरीही ‘मागासलेले’ आहोत; म्हणून आम्ही लाखोंच्या संख्येने मोर्चेही काढत आहोत.
इ. सरकार किंवा पोलीस यांच्या नाकर्तेपणामुळे या उन्मादी पद्धतीची लागण आज साथीच्या रोगांसारखी खेडोपाडी पसरत आहे.
ई. न्यायालयाने घालून दिलेले आदेशही न पाळणे, हे आज पुरुषार्थाचे लक्षण होऊन बसले आहे.
उ. सार्वजनिक गणपतीच्या मूर्तीची उंची असो किंवा बळजोरीने जमा होणारी वर्गणी असो, सर्वांनीच तारतम्याच्या लक्ष्मणरेषा ओलांडल्या आहेत.
यात सर्वांत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांचे उघड किंवा छुपे समर्थन आणि नेतृत्व आजचे सगळेच राजकीय पक्ष करत आहेत. ‘सवंग लोकानुनय’ हेच यांचे भांडवल आहे. या नेतृत्वांनी प्रबोधनाची क्षमता केव्हाच हरवली आहे.
रस्ते अडवून अन् घालून दिलेले सर्व नियम धाब्यावर बसवून साजरा होणारा दहीहंडीचा सण काय ? किंवा गणपतीचे आगमन आणि विसर्जन यांच्या मिरवणुकांच्या वेळी बीभत्स गाण्यांवर होणारे नाच काय ? आपल्या संस्कृतीचा इतिहास आपल्याला उत्सव आणि सण साजरे करण्याची हीच परंपरा दाखवतो का ? आपण हे कधीच थांबवू शकणार नाही का ?’
(साभार : त्रैमासिक, ‘सद्धर्म’, ऑक्टोबर २०१८)
सण आणि उत्सव साजरे करण्यामागील मूळ धर्मशास्त्र समाजाला न शिकवल्याने आज त्यामध्ये अनेक अपप्रकार वाढले आहेत. सण आणि उत्सव अयोग्य प्रकारे साजरे करतांना सहस्रो तरुणांचा वेळ वाया जातो, तसेच वारेमाप पैसाही खर्च होतो. देवतांची आराधना करणे, समाजाला भक्तीमार्गाकडे वळवणे आणि समाजाचे संघटन करणे या सर्व गोष्टी आता गौण झाल्या आहेत.
या परिस्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अन् आशीर्वादाने अनेक माध्यमांतून अखंड प्रयत्न करत आहेत. यामध्ये समाजाला धर्मशिक्षण देणे, अयोग्य प्रथा आणि परंपरा यांमुळे होत असलेली धर्महानी लक्षात आणून देणे, अनेक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे विविध स्तरांवर प्रबोधन करणे आदी अनेक प्रयत्न साधक निःस्वार्थीपणे आणि सेवाभावी वृत्तीने करत आहेत. श्री गणेशाच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने या कार्याला यशही लाभत आहे.’ – संकलक |