साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीने गुन्हा मान्य केला ! – पोलीस आयुक्त
मुंबई – साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीने त्याचा गुन्हा मान्य केला आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हेमंत नगराळे म्हणाले की, आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्रसुद्धा कह्यात घेण्यात आले आहे. आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सबळ पुरावे मिळाले आहेत. गुन्हा कसा झाला ? याचा घटनाक्रम पोलिसांच्या पडताळणीत निष्पन्न झाला आहे. येत्या एका मासात किंवा त्याआधी संपूर्ण प्रकरणाची पडताळणी पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि इतर अधिकारी यांची सह्याद्री येथे बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांचे साहाय्य केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
बलात्कार करणार्याविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चाही गुन्हा नोंद !
मुंबई – साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करणार्या आरोपीविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चाही गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हालदार यांनी दिली.
हालदार यांनी १२ सप्टेंबर या दिवशी पीडितेची आई, दोन लहान मुली यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन तपासकामाची माहिती घेतली. अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तरतूद असलेले सर्व आवश्यक साहाय्य पीडितेच्या कुटुंबियांना देण्याचे राज्य सरकारचे उत्तरदायित्व आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तात्काळ ४ लाख ३० सहस्र रुपये, तसेच तितकीच रक्कम आरोपपत्र प्रविष्ट झाल्यानंतर द्यावयाची आहे.