कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अल्प !
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आय.सी.एम्.आर्.चे) माजी शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर यांचा दावा
नागपूर – कोरोनाची पहिली लाट संपून दुसरी लाट संपण्याच्या स्थितीत असतांना तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे; मात्र देशात तिसरी लाट येण्याची शक्यता अल्प आहे, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर यांनी केला आहे. ‘जर तिसरी लाट आलीच, तरी ती दुसर्या लाटेपेक्षा पुष्कळ कमकुवत असेल’, असे त्यांनी म्हटले आहे.
Chances of 3rd Wave ‘Very Low’ Yet Reopening Schools Shouldn’t be Rushed: Top Scientist
(@ChandnaHimani)https://t.co/uUJzVcBj9e
— News18 (@CNNnews18) September 13, 2021
डॉ. गंगाखेडकर म्हणाले की,
१. शाळा पुन्हा चालू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घ्यायला नको; कारण लहान मुलांवर कोरोनाचा प्रभाव पुष्कळ काळ रहात आहे, असे अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे शाळा उघडण्याचा निर्णय घेतांना विचार करण्याची आवश्यकता आहे.
२. अनेक शास्त्रज्ञ मानतात की, कोरोना यापुढे नियमितचा विषाणू बनू शकतो. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना कोरोनाची लागण झाली, तरी लक्षणे दिसणार नाहीत; परंतु अल्प लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे लसीकरणानंतरही मास्क घालणे आणि सुरक्षित अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.
३. लसीचे डोस विषाणूची लागण होण्यापासून रोखू शकत नाही, तर त्यांचा धोका अल्प करतात. जोपर्यंत कोरोनाचा कुठलाही नवा प्रकार येत नाही अथवा लसीकरणाचा प्रभाव अल्प होत नाही, तोपर्यंत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला घाबरण्याची आवश्यकता नाही. विषाणूचा प्रसार ज्या ठिकाणी पहिल्या आणि दुसर्या लाटेचा प्रभाव अल्प जाणवला, तेथे असू शकतो. कोरोना विषाणू ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना लक्ष्य करू शकतो.