मेघोली (कोल्हापूर जिल्हा) तलावाचा अपघात हा नैसर्गिक ! – स्मिता माने, कार्यकारी अभियंता
कोल्हापूर – मेघोली तलाव हा ‘क्वाटर्झाईट’ खडकाच्या भुपृष्ठ रचनेतील अंतर्गत हालचालीमुळे फुटला. मेघोली तलावाचा अपघात हा नैसर्गिक आहे. याच खडक थराच्या भुपृष्ठरचनेतील वेदगंगा नदी खोर्यातील इतर तलावही आहेत. त्यामुळे आता याच प्रकारातील जलसंपदा विभागाच्या अन्य प्रकल्पांची भूगर्भीय पहाणी करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण विभाग कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली.
भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील स्थानिक ओढ्यावर २० वर्षांपूर्वी लघु पाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आला. डोंगराळ भागातील शेतीसाठी या पाण्याचा उपयोग व्हावा, या हेतूने मेघोली प्रकल्पाची उभारणी झाली. याचा लाभ प्रकल्पातील १० गावांना होत होता. प्रकल्पाच्या भिंतीतील गळती थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना आवश्यक होत्या. त्यासाठी जलसंपदा विभागाने नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेचे मत मागवले होते. गळतीच्या अनुषंगाने कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून अभ्यासासाठी दीड कोटी रुपये संमत झाले होते. त्याची निविदा प्रक्रिया चालू असतांनाच ३० ऑगस्टला मेघोली प्रकल्प फुटला.
३ सप्टेंबरला जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी प्रथमदर्शनी धरणाच्या ठिकाणी ‘क्वाटर्झाईट’ थरातून पाण्याच्या अतिरिक्त दाबामुळे खडक रिकामा होत गेला, अन् तो जागेवरून हलल्याने धरणाच्या खालील बाजूस ‘डाऊनस्ट्रिम केसिंग’चा धोका निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली; पण यासंदर्भात सविस्तर अभ्यास करून कारणमीमांसा ठरवण्यात येईल, असेही स्पष्ट केले.