सैन्यात भरती होण्यासाठी बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणारी टोळी पोलिसांच्या कह्यात !
नाशिक येथील देवळाली कॅम्प येथील सैन्याचा गुप्तचर विभाग आणि नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेची एकत्रित कारवाई !
बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्या टोळीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा झाल्यासच अशा घटनांना आळा बसेल ! – संपादक
नगर – सैन्यात भरती होण्यासाठी, तसेच सरकारी नोकरीसाठी शाळा सोडल्याच्या दाखल्यासह अन्य बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणारी टोळी पाथर्डी येथे पकडली. नाशिक येथील देवळाली कॅम्प मधील सैन्याचा गुप्तचर विभाग आणि नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. नगर आणि नाशिक मधील एकूण ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. अस्तित्वात नसलेल्या शाळांच्या नावे बनावट दाखले मिळवून अनेकांनी लष्करासह अन्य सरकारी विभागात नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी विनायक मासळकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. (या टोळीने अशाप्रकारे कुणाकुणाला सैन्यात प्रवेश मिळवून दिला आहे, याचीही चौकशी केली पाहिजे. – संपादक)