साकीनाका येथील महिलेवरील बलात्कार प्रकरणी एका मासात आरोपपत्र प्रविष्ट करा ! – मुख्यमंत्री
असुरक्षित मुंबई !
मुंबई – साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणाची पडताळणी एका मासात पूर्ण करून आरोपीवर दोषारोपपत्र प्रविष्ट करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील महिलेचा उपचार करतांना मृत्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची तातडीची बैठक बोलावली घेतली. या बैठकीत वरील आदेश दिले.
या वेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जलदगती न्याय काय असतो, ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे; जेणेकरून पुढे कुणी असे धाडस करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची सिद्धता करावी. मुंबईची एक ‘सुरक्षित शहर’ अशी प्रतिमा आहे आणि या एका घटनेमुळे ती डागाळणार नाही, याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी पुढील सूचना केल्या आहेत.
१. महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी.
२. गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसर्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्याची कार्यवाही लगेच चालू करावी.
३. महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे.
४. महिलांवर आक्रमणे होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शहरांतील महत्त्वाची ठिकाणे निश्चित करून या ठिकाणी गस्त वाढवावी.
५. प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकार्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा ठिकाणांना त्या पथकांनी दिवस रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात.
६. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित आणि एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हालवावे; अशा ठिकाणीही पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे.