वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केल्याने पुण्यात अनेक ठिकाणी भाविकांना श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रात देणे भाग पडले !

  • पुणे महापालिकेचा धर्मद्रोह ! – संपादक 
  • मूर्ती विसर्जनाचे धर्मशास्त्र पाळण्यास प्रशासनाकडून होणारा प्रतिबंध, हा हिंदूंवरील अन्यायच ! – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे, १२ सप्टेंबर – पुण्यात अनेक ठिकाणी दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तींना वहात्या पाण्यात विसर्जनास मज्जाव केल्याने भाविकांना नाईलाजास्तव त्यांच्याकडील श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रात देण्यास भाग पडले. (हिंदुबहुल देशात हिंदूंनाचा त्यांचे सण धर्मशास्त्रानुसार साजरे करता न येणे यापेक्षा दुर्दैव ते काय ? प्रत्येक वर्षी भाविकांची अशा प्रकारे असुविधा निर्माण करून महापालिका प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे ? – संपादक)

१. ओंकारेश्वर घाट येथे आलेल्या भाविकांना, ते घाटावर येईपर्यंत घाट विसर्जनासाठी बंद केल्याची माहिती त्यांना नव्हती, तसेच बंदी असल्याचे कोणत्याही प्रकारचे फलकही घाटावर नव्हते. केवळ नावापुरता कोपर्‍यात एक फलक लावला होता.  त्यामुळे अनेक भाविकांना नाईलाजास्तव मूर्ती संकलन केंद्रात श्री गणेशमूर्ती देण्यास भाग पडले. मूर्ती दान घेत असलेल्या कर्मचार्‍यांना दान घेतलेल्या मूर्तीचे पुढे काय करणार हे ठाऊक नव्हते. महापालिकेचे एक वरिष्ठ अधिकारी महांगुडे यांना दूरभाष केल्यावर त्यांनी ‘खाणीत विधीवत् विसर्जन करणार आहे’, असे सांगितले. (अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास त्याचा आध्यात्मिक लाभ सर्वांना होतो. खाणीत विसर्जन करणे हे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे ! – संपादक)

२. शुक्रवार पेठेतील आदर्श शाळेजवळील संकलन केंद्रात कर्मचार्‍यांनी ‘मास्क’ परिधान केले नव्हते, तसेच काहींनी अर्धवट मास्क घातले होते. येथील कर्मचार्‍यांकडून सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नव्हते. (नागरिकांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करणारे प्रशासन कर्मचार्‍यांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार का ? – संपादक)


वाघोली येथील खाणीत होणार श्री गणेशमूर्ती विसर्जन

पुणे – शहरात फिरत्या हौदात आणि मूर्ती संकलन केंद्रावर जमा होणार्‍या श्री गणेशमूर्तींचे शास्त्रीय पद्धतीने वाघोलीतील खाणीत पुन्हा एकदा विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी घनकचरा विभागाने निविदा काढून खाण घेतली आहे.

महापालिकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून नदीचे घाट, हौद या ठिकाणी विसर्जन व्यवस्था केली जाते. ज्या मूर्तींचे हौदात विसर्जन झाले आहे, त्या मूर्ती बाहेर काढून ट्रकमध्ये ठेवून शहराच्या बाहेरील खड्ड्यात किंवा नदीत विसर्जित केल्या जात होत्या. यामुळे मूर्तीची विटंबना होत असल्याने महापालिकेच्या या कारभारावर नागरिकांनी प्रचंड टीका केली होती. नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने महापालिकेने योग्य पद्धतीने विसर्जन करण्यासाठी प्रयत्न चालू केले. त्यामधूनच खाणीत विसर्जन करण्याचा पर्याय समोर आला. (खाणीत विसर्जन करणे ही योग्य पद्धत नसून वहात्या पाण्यात विसर्जन करणे, ही योग्य पद्धत आहे ! – संपादक)

शहराच्या हद्दीलगत अनेक ठिकाणी बंद पडलेल्या खाणी आहेत. ही खाण भाड्याने घेऊन मूर्ती तेथे नेल्या जातात. यावर्षी महापालिकेने वाघोली येथील खाण घेतली आहे. खाणीमध्ये पुढील १५ दिवस सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री १० अशा दोन पाळ्यांमध्ये महापालिकेचे पथक काम करणार आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली. (खाणीत श्री गणेशमूर्ती विसर्जन करणे म्हणजे धर्मद्रोहच होय ! – संपादक)


दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या नियोजनाचा महापालिकेचा बोजवारा : फिरते हौद उपलब्ध न झाल्याने भाविकांची मोठी असुविधा आणि मनस्ताप

पुणे महापालिकेचे फिरते हौद

पुणे – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरच्या घरी किंवा फिरत्या हौदात विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेने केले होते; मात्र विसर्जन करण्यासाठी महापालिकेने वेळेत फिरते हौद न दिल्याने दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तीचे नियोजन फसले. फिरते हौद उपलब्ध न झाल्याने भाविकांना मोठी असुविधा झाली आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी २४८ ठिकाणी मूर्ती संकलनाची सोय करण्यात आल्याचे घोषित केले होते; प्रत्यक्षात फिरते हौद कुठेच दिसले नाहीत. (एकीकडे भाविकांना शास्त्रानुसार विसर्जन करू द्यायचे नाही आणि दुसरीकडे आवाहन केल्याप्रमाणे हौदही उपलब्ध करून द्यायचे नाहीत, असे करून महापालिका प्रशासन भाविकांना अकारण वेठीस धरत आहे ! नियोजन शक्य नसेल, तर किमान भाविकांना वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे स्वातंत्र्य तरी देणे अपेक्षित आहे ! भाविकांच्या झालेल्या असुविधेविषयी महापालिका प्रशासन भाविकांची क्षमा मागणार का ? – संपादक)

घनकचरा विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय ४ फिरत्या हौदांची व्यवस्था केली होती. या गाड्यांची सजावट करण्यासाठी गणपतीचे चित्र, महापालिकेचा ‘लोगो’ आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश लावण्यास उशीर झाला. त्यामुळे फिरते हौद उपलब्ध झाले नाहीत. (यावरून पुणे महापालिकेस भाविकांच्या सोयीशी काही देणे-घेणे नसून केवळ जाहिरातबाजीतच रस असल्याचे समोर येते, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)