कोथरूड, पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शामकांत पेंडसे (वय ७९ वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. पूर्ण अंधत्व असतांनाही साधकांच्या साहाय्याने सनातन संस्था करत असलेल्या आंदोलनांना जाणे
‘श्री. पेंडसेकाकांनी नीट दिसत नसल्याने वर्ष २००० मध्ये सेवानिवृत्ती घेतली. डिसेंबर २००६ मध्ये त्यांना पूर्णपणे दिसेनासे झाले आणि पूर्ण अंधत्व आले. काका तेव्हा मुंबईमध्ये रहात होते. त्याच कालावधीत मुंबईमध्ये सनातन संस्थेची आंदोलने, निदर्शने इत्यादी सेवा चालू झाल्या होत्या. या आंदोलनांना काका साधकांच्या साहाय्याने जायचे. साधक त्यांना सगळीकडे घेऊन जायचे.
२. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ‘अंधत्व असतांना कोणती सेवा करू शकतो ?’, हे स्वतः पहाणे आणि त्यानुसार जपमाळ सिद्ध करण्याची सेवा देणे
काका एकदा निदर्शनांसाठी आझाद मैदानात गेले असतांना तिथे त्यांची भेट सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याशी झाली. काकांना बघून सद्गुरु ताईंना (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना) पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘काकांना कोणती सेवा देता येईल ?’, हे त्यांनी प्रत्येक सेवा डोळे बंद करून पाहिली. त्यांनी जपमाळ बनवण्याची सेवा डोळे बंद करून पाहिली आणि ती करता आली. तेव्हापासून काकांना जपमाळ बनवण्याची सेवा मिळाली. अशा प्रकारे काकांनी २२ जपमाळा बनवून दिल्या. त्या वेळी काकांची व्यष्टी साधनासुद्धा नियमित चालू होती.
३. परात्पर गुुरु पांडे महाराज यांनी मंत्रादी उपाय म्हणून चाक्षुषी विद्यामंत्र देणे
वर्ष २०१४ मध्ये काका देवद आश्रमात रहायला गेले. तेथे सद्गुरु अनुताई होत्या. त्यांनी काकांना परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडे नेले आणि त्यांना ‘कोणते मंत्रादी उपाय करावेत ?’, हे विचारले. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी काकांना चाक्षुषी विद्यामंत्र दिला. तो प्रतिदिन १२ वेळा म्हणायचा होता. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांच्या आवाजात तो मंत्र ध्वनीमुद्रित करून काकांना दिला आणि ‘जोपर्यंत पाठ होत नाही, तोपर्यंत ध्वनीमुद्रित केलेला ऐका’, असे सांगितले. १.८.२०१४ पासून काकांनी तो मंत्र म्हणायला आरंभ केला.
४. घराचे काम चालू असतांना घराच्या वरच्या भागातील आगाशी खचणे आणि तेव्हा ते घर सोडण्याची आतून आज्ञा होणे
काका मुंबईला असतांना त्यांच्या घराच्या खालच्या भागाचे काम चालू होते. तेव्हा घराची वरच्या भागात असणारी आगाशी खचली. तेव्हा त्यांना आतून आवाज आला, ‘हे घर सोड !’ नंतर त्यांनी ते घर विकले आणि त्या घराला ‘न भूतो न भविष्यति ।’ अशी किंमत आली. त्यानंतर वर्ष २०१५ मध्ये काका पुण्याला रहायला आले. त्यांना कधीच वाटले नव्हते की, ते मुंबई कायमची सोडून पुण्याला रहायला येतील.
५. डोळ्याचे शस्त्रकर्म केल्यावर चांगले दिसू लागणे आणि हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रजपाचा परिणाम असणे
फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांचा पुणे येथील पुतण्या त्यांना नामांकित नेत्रतज्ञांकडे घेऊन गेला. त्या नेत्रतज्ञांनी ‘डोळा बदलावा लागेल’, असे सांगितले. १६.८.२०१६ ला त्यांच्या डोळ्याचे शस्त्रकर्म झाले. जेव्हा डोळ्यांवरची पट्टी काढली, तेव्हा त्यांना समोरचे लख्ख दिसत होते. हे सर्व परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रजपामुळे शक्य झाले होते. त्यानंतर त्यांनी सद्गुरु अनुराधाताईंना दूरध्वनी केला. तेव्हा सद्गुरु ताईंनी परात्पर गुरु पांडे महाराज यांनाही ‘कॉन्फरन्स कॉल’वर जोडले. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले, ‘‘मंत्रजपाचा लाभ झाला.’’
६. डोळ्याच्या दुसर्या शस्त्रकर्माच्या वेळी संपूर्ण शरिरातून अडीच घंटे नामजप ऐकू येणे
जानेवारी २०१८ मध्ये काकांना पुन्हा थोडे अंधुक दिसायला लागले. त्यामुळे ‘परत शस्त्रकर्म करावे लागेल’, असे नेत्रतज्ञांनी सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांनी शस्त्रकर्म केले. त्या वेळी काकांना त्यांच्या संपूर्ण शरिरातून अडीच घंटे नामजप ऐकू येत होता. ‘शस्त्रकर्माला अर्धा घंटा उशीर का लागला ?’, असे काकांनी नेत्रतज्ञांना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘बुबुळाचे रोपण केले. त्यासाठी हवेचा एक बुडबुडा सोडतात. तो टिकतच नव्हता. सारखा फुटत होता; परंतु थोड्या वेळाने तो टिकला.’ परत २४ घंट्यांनी त्यांना तपासायला बोलावले होते. तेव्हा तो बुडबुडा टिकलेला होता. नेत्रतज्ञांनासुद्धा याचे आश्चर्य वाटले. ४ दिवसांनी डोळा उघडला, तेव्हा काकांना परत सगळे नीट दिसायला लागले. हे केवळ गुरुकृपेनेच शक्य झाले. त्यानंतर काकांनी परत ‘चाक्षुषी’ मंत्र म्हणायला आरंभ केला.
७. ‘आंधळ्याच्या गाई देव राखतो’, या उक्तीनुसार ‘माझा सगळा संसार व्यवस्थित चालतो, तो केवळ श्री गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने !’, असे काका सांगतात.
८. डाव्या पायाला माकड हाडाचा सांधा (हिप जॉईंट) नसतांनाही गुरुकृपेमुळे चालू शकणे
काकांच्या डाव्या पायाला माकड हाडाचा सांधा (हिप जॉईंट) नाही. लहानपणी इंजेक्शन देतांना ती सुई रुतली आणि माकड हाडाचा सांधा (हिप जॉईंट)काढून टाकावा लागला. ‘तरी काका चालू शकतात’, ही मोठी गुरुकृपा आहे.
‘काकांच्या सगळ्या अनुभूती ऐकतांना मला पुष्कळ शांत वाटत होते, तसेच काका बोलत होते ते ऐकत रहावे’, असे वाटत होते.’
– सौ. दीप्ती सांगवीकर, कोथरूड, पुणे. (मार्च २०१९)
श्री. पेंडसेकाका व्यक्त करत असलेली कृतज्ञता‘मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिम् ।’, म्हणजे ‘ज्याच्या कृपेने मुके बोलू लागतात आणि पांगळे पहाड चढून जातात’ या पंक्तीची मला पदोपदी अनुभूती येते. श्री गुरुमाऊलीच्या कोमल आणि पवित्र चरणी संपूर्ण शरणागत अन् कृतज्ञता भावाने मी सर्वस्व समर्पित करतो.’ – श्री. शामकांत पेंडसे, कोथरूड, पुणे. (मार्च २०१९) |
‘आजारपण आणि वृद्धापकाळ यांमुळे समष्टी सेवा करता येत नाही’, याची खंत वाटणार्या कोथरूड, पुणे येथील सौ. शलाका शामकांत पेंडसेआजी (वय ७९ वर्षे) यांना देवाने घरबसल्या दिलेली सेवेची संधी !
१. वर्ष २०१९ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी ‘समाजात जाऊन समष्टी सेवा करता येत नाही’, याविषयी खंत वाटणे
‘मी आणि माझे पती, श्री. शामकांत महादेव पेंडसे गेला वीस वर्षांहून अधिक काळ सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहोत. या काळात माझ्याकडून ध्येयनिश्चिती झाली नाही; पण गुरूंना अपेक्षित अशी सेवा करण्याचा प्रयत्न झाला. वयाच्या ७७ व्या वर्षी ‘समाजात जाऊन मला समष्टी सेवा करता येत नाही’, याविषयी पुष्कळ खंत वाटते. मागील चार मास मी आजाराने त्रस्त होते. मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे, नामजप करणे, तसेच गुरुदेवांना प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करणे, असे करतेे; पण आता मला मनापासून सेवाही करावीशी वाटते.
२. वैद्यकीय उपचार करण्यासाठी घरी येणार्या ‘फिजिओथेरपिस्ट’ना साधना सांगून त्यांना सनातन पंचांगाची माहिती देणे आणि त्यांनी वर्ष २०१९ च्या पंचांगाचीही मागणी करणे
माझ्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी २४ – २५ वर्षांची एक तरुण ‘फिजिओथेरपिस्ट’ येते. तिला सनातन संस्थेविषयी थोडीफार माहिती होती. मी तिला कुलदेवतेचे नामस्मरण आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप का करायचा ?’, याविषयी थोडक्यात सांगितले. त्याप्रमाणे तिने नामस्मरण चालूही केले. एकदा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांना वर्ष २०२० च्या पंचांगाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. त्या वेळी मला वाटले, ‘आपण ‘फिजिओथेरपी’ करणार्या ताईंना याविषयी सांगूया, म्हणजे त्या पंचांगाची मागणी करतील !’ मी त्यांना घरातील वर्ष २०१९ चेे पंचांग दाखवले. त्यातील दिनविशेष, मागील पानावरील शुभ-अशुभ दिवस, त्या त्या मासात येणारे सण आणि ‘ते कशा पद्धतीने साजरे करायचे ?’, या संदर्भात दिलेली माहिती हे सर्व पहातांना पंचांगातील चैतन्याने त्या भारावून गेल्या अन् म्हणाल्या, ‘‘हे सर्व माझ्या आईला आवडणारेच आहे.’’ त्यांनी मला विचारले, ‘‘वर्ष २०१९ चे पंचांग आता मिळेल का ?’’ मी म्हटले, ‘‘प्रयत्न करूया.’’ नंतर मला पंचांग मिळाले आणि मी ते त्या ताईंना दिले.
खरेतर मी जानेवारीत त्या ताईंना पंचांग देऊ शकले असते; पण दोन मास उशिरा, म्हणजे मार्चमध्ये मी त्यांना याविषयी विचारले, याची मला पुष्कळ खंत वाटली. हे सर्व लिहून देतांना ‘मी त्यांना ईश्वरी चैतन्यापासून वंचित ठेवले’, ही जाणीव होत होती.
प.पू. गुरुदेवांच्या, तसेच श्रीकृष्णाच्या चरणी कोटीश: कृतज्ञता.’
– सौ. शलाका शामकांत पेंडसे (सौ. पेंडसेआजी), कोथरूड, पुणे. (१७.३.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |