लोणकढी थाप !
संपादकीय
|
‘अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन’ याभोवती सत्तेची समीकरणे केंद्रीभूत असलेल्या काँग्रेसला आता जनतेने घरी बसवले आहे. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसी नेत्यांना आता हिंदूंची आठवण येऊ लागली आहे. या काँग्रेसींचे सर्वेसर्वा असणार्या गांधी घराण्यातील राहुल गांधी यांनी तर सत्ता गेल्यापासून या ‘रंगबदलूपणा’चा सपाटाच लावला आहे. नुकतेच राहुल गांधी यांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी ‘माझे कुटुंब काश्मिरी पंडित असून मी माझ्या बांधवांना (काश्मिरी पंडितांना) साहाय्य करीन’, असे बिनबुडाचे आश्वासन दिले. यावर ‘मी जे काही बोलेन, ते खोटे नसेल’, असा मुलामा द्यायलाही ते विसरले नाहीत. राहुल गांधी ‘विस्थापित’ काश्मिरी हिंदु नाहीत. त्यामुळे विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या भयावह जीवनाची त्यांना कल्पना कशी असेल ? राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या सद्भावनेची (?) सत्यासत्यता ‘ते किती प्रमाणात कृतीशील होतात आणि दिलेला शब्द पाळतात ?’, यातून उघड होणारच आहे; मात्र अनेक दशके ज्या काँग्रेसी धोरणामुळे हिंदू विशेषत: काश्मिरी हिंदू होरपळले आहेत, ते या महाशयांवर निश्चितच विश्वास ठेवणार नाहीत. ज्या काँग्रेसचा वारसा राहुल गांधी चालवतात, त्या काँग्रेसने काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात काय केले ? हे सर्वप्रथम जाणणे क्रमप्राप्त आहे.
जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार !
काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तेथील मूळ हिंदु नागरिकांना उखडून फेकणे, हा धर्मांधांचा हेतू आहे. वर्ष १९९० मध्ये साडेचार लाख काश्मिरी हिंदू भयंकर अत्याचारांना तोंड देत विस्थापित झाले. या क्रूर धर्मांधतेला शेख अब्दुल्ला आणि त्यांच्यानंतर त्यांच्या वारसांनी खतपाणी घातले, सत्तेच्या आडून संरक्षण पुरवले. या अब्दुल्ला घराण्याशी काँग्रेसचे सख्य आहे. वर्ष २००० मध्ये ओमर अब्दुल्ला यांनी काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाची योजना राबवली. काँग्रेस सरकारने ‘अॅपेक्स समिती’ स्थापन करून त्यात काश्मिरी हिंदूंचा समावेश केला. काश्मिरी हिंदूंना १ सहस्र ६०० कोटी रुपयांचा पुनर्वसन निधी देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेस सरकार यांनी केले. काश्मिरी हिंदूंचे विस्थापन झाले, तेव्हा त्यांच्या संपत्तीचे मूल्य १७ सहस्र कोटी रुपये होते. त्यामुळे तुटपुंजे आर्थिक साहाय्य देऊन आणि मुळात काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाचे मूल्य पैशांत करून ‘अब्दुल्ला-काँग्रेसी’ जोडीने त्यांचा अपमान केला. भरीस भर म्हणून खोटा प्रचार केला की, आम्ही काश्मिरी हिंदूंना बोलावत आहोत; पण तेच काश्मीरमध्ये येण्यास सिद्ध नाहीत. हा काश्मिरी हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. काश्मिरी हिंदूंनी साहाय्य मागताच या जोडगोळीने त्यांना हाकलून दिले. अशा प्रकारे जगासमोर एक तोंडवळा आणि प्रत्यक्षात दुसरा (हिंदुविरोधी) तोंडवळा असा खेळ खेळून काँग्रेसने काश्मिरी हिंदूंना डागण्या दिल्या आहेत. ज्या जिहादी आतंकवादाने काश्मिरी हिंदूंना परागंदा केले, त्या आतंकवादाला, तसेच त्याला जन्म देणार्या पाकला काँग्रेसने दीर्घकाळ सत्तेत असतांना अभय दिले.
पंजाबमधील काँग्रेसचे राज्य अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांचे सल्लागार मलविंदरसिंह माली यांनी काश्मीरचे अस्तित्व भारतापासून वेगळे असल्याची राष्ट्रद्रोही भाषा केली आहे. वर्ष २०१९ मध्ये भाजप सरकारने कलम ३७० हटवून काश्मिरी हिंदूंना काश्मीरप्रवेश खुला केला. यावर एका पाकिस्तानी पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ‘काँग्रेस सत्तेत आल्यानंतर कलम ३७० लागू करण्यावर पुनर्विचार करू’, असे वक्तव्य केले. धर्मांधांचे लांगूलचालन करणार्या अशा हिंदुविरोधी नेत्यांचा भरणा काँग्रेसमध्ये आहे.
काश्मिरी हिंदूंसाठी हे करणार का ?
काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे आज हिंदूंना पुनर्वसनासाठी काश्मीरप्रवेश तर मोकळा झाला आहे; मात्र ज्या भीतीच्या वातावरणात काश्मिरी हिंदूंचे विस्थापन झाले, त्याच भीतीच्या छायेत पुन्हा जाऊन रहाणे काश्मिरी हिंदूंसाठी अशक्य आहे. त्यांना प्राधान्याने सुरक्षेची आवश्यकता आहे. ही सुरक्षा पुरवण्यासाठी राहुल गांधी काय करणार आहेत ? काश्मिरी हिंदूंना धर्मांधांकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही, याची हमी राहुल गांधी देणार आहेत का ? किंवा धर्मांधांवर तसा धाक निर्माण करणार आहेत का ? काश्मिरी हिंदूंच्या काश्मीरमधील मूळ जागा पालटल्या आहेत. पुनर्वसनासाठी राहुल गांधी या जागा कशा प्रकारे मिळवून देणार आहेत? धर्मांधांनी बळकावलेल्या भूमी आणि घरे त्यांच्या कह्यातून मुक्त करून ती काश्मिरी हिंदूंना देणार आहेत का ? काश्मिरी हिंदूंच्या हक्काचे ‘पनून काश्मीर’ मिळवण्यासाठी राहुल गांधी आंदोलने करणार आहेत का ? काश्मिरी हिंदू नरसंहाराचे बळी आहेतच; परंतु ते नरसंहार नाकारल्याचेही बळी आहेत. त्यामुळे ‘काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर त्यांचा वंशविच्छेद झाला, हे प्रथम अधिकृतरित्या मान्य करावे लागेल. असे होण्यासाठी राहुल गांधी केंद्रशासनाकडे तशी मागणी करणार आहेत का ? सामान्य भारतीय हिंदूला १९९० च्या दशकात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराविषयी ठाऊक नाही. त्यामुळे ‘काश्मिरी हिंदूंना सर्व भारतियांच्या सद्भावना आणि पाठिंबा मिळावा’, यासाठी राहुल गांधी देशभर प्रचार करणार आहेत का ? काश्मिरी हिंदूंच्या संहाराला कारणीभूत असलेल्या ‘इस्लामिक आतंकवादा’वर राहुल गांधी जागतिक स्तरावर चर्चा घडवून आणणार आहेत का ? इस्लामिक आतंकवादाची भलावण करणार्यांचा उघड निषेध करणार का ? काश्मिरी हिंदूंच्या दु:खावर डागण्या देणार्या दिग्विजय सिंह यांच्यासारख्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करणार का ? यांसारख्या असंख्य प्रश्नांना जर राहुल गांधी यांचे सकारात्मक आणि कृतीशील उत्तर असेल, तरच ‘त्यांना काश्मिरी हिंदूंविषयी खरेच कळवळा आहे’, असे म्हणता येईल. अन्यथा ‘राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे मतांसाठी मारलेली शुद्ध लोणकढी थाप आहे’, असेच म्हणावे लागेल !