स्वार्थासाठी लोकप्रतिनिधींच्या पायावर लोटांगण घालणारे पोलीस अधिकारी !
गुन्हेगारांविषयी सर्व माहिती पोलिसांना ठाऊक असूनही त्यांनी राजकारण्यांच्या दबावापोटी करवाई न करणे, हे लोकशाहीला लज्जास्पद ! – संपादक
सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीसपोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक |
१. लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार वागणारे आणि जणू काही त्यांच्या ताटाखालचे मांजर होणारे पोलीस अधिकारी !
‘काही पोलीस अधिकारी पैसे देऊन त्यांना पाहिजे असलेले पोलीस ठाणे कर्तव्यासाठी मिळवतात. त्यानंतर तेथे राहून ते अवैध मार्गांनी पैसेे मिळवतात. यासाठी ते त्यांच्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी (आमदार किंवा खासदार) जसे सांगतील तसे ऐकतात. अशा पोलीस अधिकार्यांच्या हाताखाली नोकरी करणे प्रामाणिक कर्मचार्यांना कठीण होते. एका तालुक्याच्या पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे एक पोलीस निरीक्षक होते. ते एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे आमदारांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करत असत. भर बाजारातही गाडी थांबवून आणि आमदारांच्या गाडीजवळ जाऊन वाकून नमस्कार करण्यात त्यांना धन्यता वाटत असे. अर्थात् त्या आमदारांचे कार्यकर्ते वरचढ झाल्यामुळे पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावणे कठीण जात होते.
२. अधिकार्यांची मर्जी संपादन करू पहाणार्या पोलीस कर्मचार्यांमुळे प्रामाणिक कर्मचार्यांवर अन्याय होणे
काही पोलीस कर्मचारीही स्वतःला अपेक्षित असे पोलीस ठाणे मिळवण्यासाठी पैसे देतात. त्यांना त्यांच्या अधिकार्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे एवढेच काम असते. त्यामुळे अन्य प्रामाणिक कर्मचार्यांना कामाचा अधिकचा भार मुकाट्याने सहन करावा लागतो. ही वस्तुस्थिती सर्वत्र आहे.
३. गुन्हेगारांविषयी सर्वज्ञात असूनही राजकीय पक्षांच्या दबावामुळे पोलिसांना अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात अडचणी येणे
पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी किंवा चौकी अंमलदार यांना त्यांच्या पोलीस क्षेत्रात असणारे गुन्हेगार, गुन्हेगारी प्रवृतीचे लोक, दारू, मटका, जुगार, गांजा आणि चरस यांची विक्री करणार्यांची माहिती असते. तसेच कुठे काय चालते, हेही पोलिसांना ठाऊक असते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी आणि अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांना वेळ लागणार नाही. अशा अवैध व्यवसायांमध्ये गुंतलेले लोक कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्याच आश्रयाखाली असतात. त्यामुळे पोलिसांना स्वत:चे अधिकार वापरून त्यांच्यावर कारवाई करणे कठीण जाते.
४. पोलीस अधिकार्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी राजकारण्यांनी त्यांच्या पदांमध्ये वाढ करणे, गुन्हेगार राजकारण्यांच्या आश्रयाला असल्यानेच त्यांच्यावर ठोस कारवाई करता न येणे आणि त्यातून समाजाची स्थिती खालावणे
पोलीस विभागाकडे अंतर्गत सुरक्षेचे दायित्व आहे; पण या विभागामध्ये राजकारण्यांची मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ चालते. राजकारण्यांनीच पोलीसदलातील पदांमध्ये वाढ केली. पूर्वी ज्या ठिकाणी पोलीस फौजदार (पोलीस उपनिरीक्षक) पोलीस ठाण्याचे कामकाज पहायचे, त्या ठिकाणी ‘पोलीस निरीक्षक’ या पदाची नेमणूक करण्यासह त्यांनी अन्य पदांमध्येही वाढ केली. यातून त्यांनी अधिकार्यांना प्रसन्न करण्याचा आणि त्यांच्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला; पण अशा स्थितीत अधिकार्यांमध्ये त्यांचे अधिकार वापरण्याचे धैर्यच रहात नाही. पोलिसांना स्वतःचे अधिकार वापरण्याची मुभा मिळाली, तर जनतेच्या आंदोलनामध्ये एकही पोलीस मार खाणार नाही. समाजातील गुन्हेगारी वृत्तीचे लोक राजकारण्यांच्या आश्रयाला असल्यामुळेच त्यांच्यावर ठोस कारवाई होेत नाही. यातूनच समाजाची स्थिती खालावली आहे.’
– माजी पोलीस अधिकारी