मनसुख हिरेनला ‘फेसटाईम अॅप’च्या माध्यमातून मारण्याचे निर्देश ! – तपासात खुलासा
व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचे प्रकरण
मुंबई – मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी एका ‘फेसटाईम अॅप’च्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते, असे या प्रकरणाच्या आरोपपत्रात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए) म्हटले आहे. अँटिलिया प्रकरणात १० सहस्र पानांचे आरोपपत्र सादर केले आहे.
या आरोपपत्रनुसार, या ‘फेसटाईम अॅप’ला सक्रीय करण्यासाठी ISE####@gmail.com या ‘जीमेल आयडी’चा वापर केला गेला होता. अन्वेषण यंत्रणेने या ‘जीमेल’ खात्याशी कोणाचा संपर्क क्रमांक जोडला आहे आणि त्या व्यक्तीचे नाव काय ?, हे जाणून घेण्यासाठी ‘अॅप’च्या विधी पथकाशी संपर्क साधला. या पथकाने या ‘फेसटाईम’ खात्याचे पहिले नाव कुरकुरे आणि शेवटचे नाव बालाजी असल्याचे पोलिसांना सांगितले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हाताखाली काम करणार्या एका पोलीस कर्मचार्याने सांगितले की, परमबीर सिंह यांच्या ‘आयफोन आयडी’चे पहिले नाव ‘कुरकुरे’ आणि शेवटचे नाव ‘बालाजी’ होते. कर्मचार्याच्या या विधानामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेला परमबीर सिंह यांच्यावर संशय वाढत गेला. ‘आयडी’ सिद्ध करतांना या दोन्ही ‘ब्रँड’चे ‘स्नॅक्स’ (खाद्यपदार्थ) कार्यालयात होते, त्यामुळे हे नाव सिद्ध करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.