पुणे येथे नागरिक घाटांवरून विसर्जन न करताच परतले !
पुण्यात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून कोणतीही सोय नाही !
पुणे – दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाकडून कोणतीही सोय करण्यात आली नसल्याने अनेक नागरिकांना विसर्जन घाटांवरून विसर्जन न करताच परत जावे लागले. पालिका प्रशासनाने विसर्जनासंदर्भात एक पत्रक काढले आहे. त्यात प्रत्येक वर्षी ५ लाख मूर्ती विसर्जित होतात. यावर्षीही इतक्या प्रमाणात विसर्जनासाठी लोक बाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी घरच्या घरी मूर्ती विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. (पालिकेने सांगितलेली संख्या ही १ दिवसाची आहे कि गणेशोत्सव संपेपर्यंतची संख्या आहे ? प्रत्यक्षात ज्या ज्या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते त्या त्या दिवशी सुनियोजन करून वहात्या पाण्यात विसर्जनाची सोय करून देणे, हे पालिकेचे कर्तव्य आहे. तसे न करता पालिकेने बहुसंख्यांक हिंदूंना धर्मपालनापासून रोखणे अत्यंत चुकीचे आहे. अतार्किक कारणे देऊन समाजाला धार्मिक कृती करण्यापासून परावृत्त केल्याने धर्मशास्त्रानुसार पाप लागते. तरी प्रशासनाने याचा विचार करून पुढील दिवशी तरी भाविकांना वहात्या पाण्यात विसर्जन करण्याची सोय करून द्यावी. – संपादक)
घरोघरी अमोनियम बायकार्बाेनेट हे रसायन वापरून विसर्जन करावे, अथवा पालिकेकडून फिरत्या हौदांची सोय करण्यात आली आहे त्यात विसर्जन करावे, असे पालिकेने म्हटले आहे. (मागील काही वर्षांमध्ये कचर्याच्या गाड्यांमधून मूर्ती नेणे, कृत्रिम हौदातील मूर्ती पुन्हा नदीत टाकणे, असे अनेक प्रकार पुणेकर नागरिकांनी पाहिले आहेत. प्रत्यक्षात मूर्तींची संख्या आणि पालिकेच्या हौदांची संख्या यातही मोठी तफावत असल्याने प्रशासनाचे नियोजन प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही फोल ठरणार आहे, असेच दिसत आहे ! – संपादक)