‘प्रवेश शुल्क’च्या नावाखाली इन्सुली येथील आर्.टी.ओ. तपासणी नाक्यावर वाहनचालकांची लूट ! – शैलेश लाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधणार !
सावंतवाडी – मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आर्.टी.ओ.च्या) तपासणी नाक्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून ‘प्रवेश शुल्क’च्या (एन्ट्री फीच्या) नावाखाली वाहनचालकांची लूट केली जात आहे. येथे कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी लाखो रुपयांची वरकमाई करत आहेत. याविषयीचे पुरावे उपलब्ध असून ते लवकरच उघड करून संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी वरिष्ठांचे लक्ष वेधणार आहे, अशी चेतावणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शैलेश लाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. (शासन आणि वरिष्ठ अधिकारी यांनी या आरोपांची चौकशी करून त्यात दोषी आढळणार्यांवर त्वरित कारवाई करावी ! – संपादक)
या पत्रकात लाड यांनी म्हटले आहे की, ओरोस येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाचे जिल्हा कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. हे कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी नसून येथे काम करण्यासाठी दलाल निर्माण करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक तक्रारी आल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात जनतेची आर्थिक स्थिती ढासळलेली असतांना कारवाईचा बडगा दाखवत आर्.टी.ओ. मात्र वारेमाप कमाई करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात होणारी गौण खनिजाची अवैध वाहतूक या कार्यालयाशी असलेल्या हितसंबंधांमुळेच होत आहे. एका रात्री तब्बल ५०० हून अधिक डंपर प्रवेश शुल्क भरून वाहतूक करत आहेत. याच्या विरोधात वरिष्ठ अधिकार्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेही लक्ष वेधणार आहे. (वाळू, खडी आदी गौण खनिज, मद्य, तसेच अन्य गोष्टींची अवैध वाहतूक होण्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी सरकारी यंत्रणांमधील (पोलीस, आर्.टी.ओ. आदी) भ्रष्टाचार हे महत्त्वाचे कारण आहे. भ्रष्टाचार करणार्यांना धाक बसेल, अशी कठोर कारवाई त्यांच्यावर होत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार थांबणे आणि भारत भ्रष्टाचार मुक्त होणे महाकठीण ! – संपादक)