मुंबई येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !
-
२४६ ठिकाणी विसर्जनाची सोय !
-
७३ नैसर्गिक आणि १७३ ठिकाणी कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन !
मुंबई – दीड दिवसाच्या येथील घरगुती श्री गणेशमूर्तींचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात विसर्जन करण्यात आले. श्री गणेशचतुर्थी दिवशी घरगुती आणि सार्वजनिक, अशा एकूण २ लाख श्री गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ७३ नैसर्गिक आणि १७३ ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण केले आहेत. यामध्ये भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यंदा समुद्रात जाऊन विसर्जन करण्याला महापालिका प्रशासनाने बंदी घातली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे, तसेच राज्य सरकार आणि महापालिका यांनी निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार भाविकांनी विसर्जनस्थळी श्री गणेशमूर्ती महापालिका कर्मचार्यांच्या स्वाधीन केल्या. त्यानंतर महापालिका कर्मचार्यांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिक किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते यांनी थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध घालण्यात आले होते, १७३ कृत्रिम तलावांत भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले. मूर्ती संकलन केंद्र, कृत्रिम तलाव किंवा नैसर्गिक विसर्जन स्थळ यांवर उपलब्ध महापालिकेच्या व्यवस्थापनाकडे मूर्ती सुपुर्द करण्यात आल्या.
याविषयी मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबई येथे अनुमाने २ लाख घरगुती गणपति, तर १२ सहस्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या वेळी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी महापालिकेने नियमावली सिद्ध केली आहे. नागपूर खंडपिठाने ‘नैसर्गिक ठिकाणी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये,’ असे दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात येईल. बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावे, हाच आमचा प्रयत्न असून त्यासाठी मुंबई येथील विसर्जन स्थळांची संख्या वाढवण्यात येईल. सोसायट्यांमध्ये विसर्जनाची व्यवस्था केली जाईल.