पश्चिम महाराष्ट्रात श्री गणेशमूर्तींचे उत्साहात विसर्जन !
पुणे, कोल्हापूर येथे वहात्या पाण्यात विसर्जनावर बंदी
कोल्हापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या संसर्गाची पार्श्वभूमी असली तरी भाविकांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्साह कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रात दीड दिवसाच्या मूर्तीचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. सांगली-मिरज आणि सातारा येथे प्रशासनाने वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास मनाई केली नव्हती, त्यामुळे भाविकांनी कृष्णा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले. कोल्हापूर येथे पंचगंगा नदी, रंकाळा तलाव येथे विसर्जनास बंदी होती, तसेच पुणे शहरातही विसर्जनास बंदी असल्याने भाविकांना नाईलाजाने कुंडातच विसर्जन करावे लागत होते. सोलापूर येथील नागरिकांनी सिद्धेश्वर तलाव, संभाजी तलाव आणि हिप्परगा तलाव येथे विसर्जन केले. (अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास त्याचा आध्यात्मिक लाभ सर्वांना होतो. त्यामुळे प्रशासनाने धर्मशास्त्रानुसार आवाहन करणे अपेक्षित आहे ! धर्मशिक्षण नसल्याचा हा परिणाम !- संपादक)
सांगली, मिरजेत ११ सप्टेंबरला सकाळपासून ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपति आहे त्यांच्याकडे सिद्धता चालू होती. दुपारी ४ नंतर सांगलीत सरकारी घाट परिसरात, तर मिरज शहरात कृष्णा नदी आणि श्री गणेश तलावात विसर्जन करणार्या भाविकांची संख्या अधिक होती. यंदा शाडूच्या गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठापना केल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही भाविकांनी घरीच विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. १२ सप्टेंबरला गौरीचे आगमन होणार असल्याने शनिवारी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात नागरिकांची तुडुंब गर्दी !
सुरक्षित सामाजिक अंतराचा फज्जा !
पुणे – गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, फळे-फुले खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने रस्त्यांवर गर्दी झाली. सुरक्षित सामाजिक अंतराचे कोणत्याही प्रकारे पालन करण्यात येत नव्हते. वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न चालू होते. नागरिकांनी गणरायाच्या दर्शनासाठी बाहेर न पडता ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले.