श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट देण्याचा पुणे महापालिकेचा हिंदु धर्मशास्त्रविरोधी निर्णय !
हिंदुद्वेष्ट्या पुणे महानगरपालिकेचा मनमानी कारभार !
|
पुणे, ११ सप्टेंबर – गणेशोत्सवात अनेक हिंदूंच्या घरातील श्री गणेशमूर्तींचे दीड दिवसानंतर विसर्जन केले जाते. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरात १९० फिरते हौद ठेवले असून २४७ ठिकाणी श्री गणेशमूर्ती जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन करावे, यासाठी अनुमाने १९० मेट्रिक टन अमोनियम बायकार्बोनेट वितरित करण्यात आले आहे. नागरिकांनी त्यामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माल्य सिद्ध होते. हे निर्माल्य नदी, कालवा, तलाव यांमध्ये टाकू नये. त्याऐवजी ते महानगरपालिकेकडे दिल्यास त्यापासून खत निर्मिती करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य कचरा गोळा करणार्यांकडे द्यावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. (फुले, पत्री यांसारख्या निर्माल्यामुळे पाणी प्रदूषित होत नाही, हे सिद्ध झाले आहे. याउलट निर्माल्यातील चैतन्य पाण्यात गेल्यामुळे पाण्याद्वारे ते चैतन्य सर्वदूर पसरते आणि त्याचा लाभ सर्वांनाच होतो. धर्मशिक्षण नसल्यामुळे निर्माल्यापासून खत निर्मितीच्या संकल्पना पुढे येत आहेत, हे दुर्दैवी आहे ! – संपादक)
मनुष्याचे स्वास्थ्य, तसेच झाडांना हानीकारक ठरणारे ‘अमोनियम बायकार्बोनेट’ रसायन !
‘अमोनियम बायकार्बोनेट’चा पाण्याशी संपर्क आला की, अमोनियम वायू निर्माण होतो. तो घसा, श्वसननलिका, त्वचा, तसेच डोळे यांना हानीकारक आहे. या रसायनाची ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेल्या गणेशमूर्तींशी रासायनिक प्रक्रिया झाल्यावर ‘कॅल्शियम कार्बाेनेट’ म्हणजे चुना आणि ‘अमोनियम सल्फेट’ हे पदार्थ सिद्ध होतात. त्यांपैकी ‘अमोनियम सल्फेट’ हे खत म्हणून वापरू शकतो, असे सांगितले जाते; पण ते ‘ॲसिडिक’ (आम्लयुक्त) आहे. ते झाडांना हानीकारक ठरू शकते.