स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या आई-वडिलांच्या सेवेविषयी त्यांचे कनिष्ठ बंधू डॉ. विलास आठवले यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
‘वर्ष १९९० पासून सनातन संस्थेचे कार्य मुंबई येथे चालू झाले. तेव्हापासून आम्ही काही साधक प.पू. डॉक्टरांच्या घरी सेवेनिमित्त जाऊ-येऊ लागलो. त्या वेळी प.पू. डॉक्टरांचे आई-वडील त्यांच्याकडे रहात होते. आम्ही सर्व साधक त्यांना प.पू. डॉक्टर संबोधायचे त्याप्रमाणे ‘ताई’ आणि ‘दादा’ असे संबोधत होतो. ते दोघेही आम्हा सर्व साधकांवर भरभरून प्रेम करायचे. ते आम्हाला स्वत:च्या कुटुंबाचाच एक भाग समजायचे. सध्या समाजात आई-वडील वृद्ध झाले की, मुलांना नकोसे होतात. काहीजण ‘त्यांची अडगळ नको’; म्हणून वेगळे घर घेऊन रहातात, तर काही जण त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात. ज्या आई-वडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार करून समाजात नावलौकिक मिळवून दिला, त्यांच्याप्रती किती हा कृतघ्नपणा ? ‘अशा समाजाला योग्य दृष्टीकोन मिळावा’, यासाठी प्रत्यक्ष भगवंताने (परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी) त्याच्या आई-वडिलांची सेवा कशी केली ?’, हे पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल आणि ‘देवाची प्रत्येक कृती किती परिपूर्ण असते ?’, हेही शिकता येईल.
सेवा करतांना प्रत्येक कृतीला भक्तीमार्गानुसार भावाची आणि कर्मयोगानुसार परिपूर्णतेची जोड दिल्यास निश्चितच ती कृती आध्यात्मिक स्तरावर होते; मग ‘ती कृती संतांसाठी केलेली असो किंवा आई-वडिलांसाठी केलेली असो, तिचा आध्यात्मिक लाभ मिळतोच !’, असा सर्वव्यापक समष्टी दृष्टीकोन प.पू. डॉक्टरांच्या या कृतींतून मिळतो. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या आई-वडिलांच्या केलेल्या सेवेतून समष्टीला बरेच काही शिकता येईल. या लेखात परात्पर गुरु डॉक्टरांचे कनिष्ठ बंधू डॉ. विलास आठवले यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आई-वडिलांची सेवा कशी केली ?’ याविषयी सांगितलेली सूत्रे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या मातृ-पितृसेवेतील मी अनुभवलेली सूत्रे पुढेे दिली आहेत.’
– श्री. दिनेश शिंदे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. आर्थिक परिस्थिती बेताची असतांनाही प.पू. बाळाजी आठवले आणि पू. (सौ.) नलिनी आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आई-वडील) यांनी सुटीत मुलांना बाहेरगावी फिरायला घेऊन जाणे आणि याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात नेहमीच कृतज्ञताभाव असणे
‘वर्षभर आम्ही सर्व भावंडे शाळेचा अभ्यास करण्यात व्यस्त असायचो. तीर्थरूप दादा (प.पू. बाळाजी आठवले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील) शाळेत शिक्षक असल्यामुळे त्यांना प्रतिदिन शाळेत जावे लागायचे. त्यामुळे आमच्या कुटुंबियांचे कुठेही बाहेर जाणे व्हायचे नाही; मात्र मे मासात (महिन्यात) शाळेला सुटी लागल्यावर ती. दादा आणि पू. ताई (पू. (सौ.) नलिनी आठवले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आई) आम्हा सर्व भावंडांना बाहेरगावी फिरायला घेऊन जायचे. जातांना आम्ही स्वयंपाकाचे सर्व साहित्य समवेतच घेऊनच जायचो. ‘आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसूनही ती. दादा आणि ताई यांनी आमच्यासाठी हे सर्व केले’, हा कृतज्ञताभाव प.पू. डॉक्टरांमध्येे नेहमीच होता.
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आईवडिलांना इंग्लंडमध्ये बोलावून घेऊन तेथील प्रेक्षणीय स्थळे दाखवणे आणि भारतात परतल्यावरही तीर्थक्षेत्रे यांचे दर्शन घडवणे
प.पू. डॉक्टरांचे इंग्लंडमध्ये ७ वर्षे वास्तव्य असतांना त्यांनी ती. दादा आणि पू. ताई यांना काही दिवसांसाठी तेथे बोलावून घेतले आणि त्यांना युरोपमधील प्रेक्षणीय स्थळे दाखवली. प.पू. डॉक्टर इंग्लंडहून त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात परत आले आणि त्यांनी मुंबईत ‘मानसोपचार तज्ञ’ म्हणून व्यवसाय चालू केला. प्रत्येक शनिवार आणि रविवारी त्यांचा दवाखाना बंद असायचा. त्या वेळी ते आई-वडिलांना चारचाकी गाडीतून प्रेक्षणीय स्थळे आणि देवदर्शन यांसाठी घेऊन जायचे. प.पू. डॉक्टरांच्या या कृतीमधून त्यांच्या मनात आई-वडिलांप्रती असलेला कृतज्ञताभाव दिसून येतो. आपल्यासाठी पू. ताई आणि ती. दादांनी घेतलेले कष्ट त्यांनी स्वतः अनुभवले होते. त्यांना त्याची जाणीव सतत होती.
२. एका ज्योतिष्याने ‘आई-वडील शेवटपर्यंत प.पू. डॉक्टरांकडे रहातील’ असे सांगणे
‘आम्ही सर्व भावंडे लहान असतांना आई-वडिलांनी एका ज्योतिषाला प.पू. डॉक्टरांची पत्रिका दाखवली होती. ती पत्रिका पाहून ज्योतिषाने ‘आई-वडील शेवटपर्यंत यांच्याकडे रहातील’, असे सांगितले. ईश्वरी नियोजनाप्रमाणे पू. ताई आणि ती. दादा शेवटपर्यंत प.पू. डॉक्टरांकडेच राहिले.’
३. प.पू. डॉक्टरांनी आई-वडिलांना कायमस्वरूपी स्वतःच्या निवासस्थानी आणणे
३ अ. सर्व मोठी भावंडे शिक्षण आणि व्यवसाय या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी रहात असणे : प.पू. डॉक्टर पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्याचप्रमाणे अन्य भाऊही स्वत:च्या व्यवसायासाठी अन्य ठिकाणी गेले आणि तेथेच वास्तव्य करून त्यांच्या व्यवसायात व्यस्त झाले. त्या काळात ती. ताई आणि ती. दादा हे आमच्या जुन्या घरी, म्हणजे गिरगावातच रहात होते. त्यांचे वयही झाले होते. तेव्हा केवळ मी एकटाच आई-वडिलांच्या समवेत राहून त्यांची सेवा करत होतो. प.पू. डॉक्टर इंग्लंडहून भारतात परत आल्यावर त्यांनी शीव येथे त्यांचा व्यवसाय चालू केला आणि ते तेथेच राहू लागले.
३ आ. वडिलांना दुसर्यांदा हृदयविकाराचा झटका आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी आई-वडिलांना कायमस्वरूपी स्वतःच्या निवासस्थानी रहाण्यास घेऊन जाणे : ती. दादांना पहिला हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा त्यांना शीव येथील ‘लोकमान्य टिळक’ रुग्णालयात भरती केले होते. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या खाण्या-पिण्याची आणि अन्य सर्व गोष्टींची व्यवस्था केली. ती. दादा बरे झाल्यावर गिरगावला परत आले. काही दिवसांनी त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला. त्या वेळीही त्यांना पुन्हा रुग्णालयात भरती केले. ती. दादांना वैद्यकीय तपासणीसाठी प्रत्येक वेळी गिरगावहून शीव येथे आणावे लागे. त्यामुळे त्यांना त्रासही होत होता. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी विचार केला, ‘गिरगावच्या घरात विलास एकटाच रहातो. तो कुठे बाहेर गेल्यावर ताई किंवा ती. दादांना काही झाले, तर कळणार नाही. अनेक वर्षे विलास त्यांची सेवा करत आहे. आता त्याला त्या दायित्वातून मोकळे करून आई-वडिलांना आपल्याकडे, म्हणजे शीव येथील घरी घेऊन यायला पाहिजे.’ त्यानंतर प.पू. डॉक्टरांनी आई-वडिलांना कायमस्वरूपी शीव येथे रहायला नेले आणि शेवटपर्यंत त्यांची मनोभावे सेवा केली.
४. ‘आई-वडिलांची सेवा कशी करावी ?’, याचा आदर्श वस्तूपाठ घालून देणारे प.पू. डॉक्टर !
४ अ. प.पू. डॉक्टर आई-वडिलांची सेवा सहजभावात करायचे. त्यासाठी त्यांना कुणी काही शिकवावे लागले नाही.
४ आ. अध्यात्मप्रसारासाठी बाहेरगावी जावे लागल्यावर स्वतःच्या अनुपस्थितीत आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी साधकांना सिद्ध करणे : पुढे ‘अध्यात्मप्रसार करणे’, हे प.पू. डॉक्टरांचे ध्येयच झाले होते. त्यामुळे अनेकदा त्यांना बाहेरगावी जावे लागायचे. त्या कालावधीत प.पू. डॉक्टर घरी नसल्यामुळे ताई आणि ती. दादा यांना काही अडचण येऊ नये, यासाठी प.पू. डॉक्टरांनी साधकांना ‘त्यांची सेवा कशी करायची ?’, हे शिकवून सिद्ध केले. साधकांना सिद्ध केल्यावरही ‘साधक त्यांची सेवा व्यवस्थित आणि वेळेवर करत आहेत ना ?’, हे ते सातत्याने पहात होते. ‘आता साधकांना शिकवले आहे. तेव्हा स्वत:चे कर्तव्य संपले’, असे त्यांनी कधीच केले नाही. शेवटपर्यंत त्यांनी ताई आणि ती. दादा यांची काळजी घेतली.
४ इ. प.पू. डॉक्टर कुठेही बाहेर गेले, तरी ‘आई-वडिलांची सेवा व्यवस्थित होत आहे ना ?’, याची त्यांनी चौकशी करणे : ‘ ते कुठेही बाहेर गेले किंवा संत किंवा प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे गेले, तरी त्यांचे लक्ष ती. दादा आणि ताई यांच्याकडेे असायचे. ‘त्यांचे सर्व व्यवस्थित होत आहे ना ?’, हे ते तेथूनही दूरभाष करून विचारायचे.’
– डॉ. विलास आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कनिष्ठ बंधू) (२४.८.२०२०)
(क्रमश: पुढील रविवारी)
पुढील भाग वाचण्यासाठी https://sanatanprabhat.org/marathi/523270.html या लिंकवर क्लिक करा.