राजकीय पक्षांच्या सभा, मेळावांमधील गर्दी चालते; मात्र गणेशोत्सवासारख्या उत्सवांवरच निर्बंध का ? – हिंदूंचा सामाजिक माध्यमांद्वारे संताप
कोल्हापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) – गेल्या काही मासांच्या कालावधीत झालेली गोकुळ निवडणूक, विविध आंदोलने, मेळावे, राजकीय पक्षांच्या सभा यांना झालेली गर्दी चालते; मात्र गणेशोत्सवासारख्या हिंदूंच्या उत्सवांवरच निर्बंध का ? असा परखड प्रश्न सामाजिक माध्यमांद्वारे हिंदूंकडून विचारला जात आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संदर्भ देत राज्यशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये; म्हणून श्री गणेश मंडपात दर्शनाला बंदी यांसह अन्य अनेक कडक निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सरकारच्या दुटप्पी वागणुकीमुळे जनतेमध्ये चीड ! – अधिवक्ता रणजितसिंह घाटगे, जिल्हामंत्री विश्व हिंदु परिषद
हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे बंद असून हिंदूंच्या प्रत्येक सण, उत्सव यांवर बंदी आहे. अन्य सर्व चालू आणि धार्मिक स्थळे अन् कार्यक्रम मात्र बंद, असे असल्याने सरकारच्या दुटप्पी वागणुकीमुळे जनतेमध्ये चीड निर्माण होत आहे.
कोरोनाचा संसर्ग केवळ गणेश मंडळांच्या मंडपातच होतो का ? – राहुल चिकोडे, जिल्हाध्यक्ष, भाजप
मद्यालये, ‘मॉल’ चालू आहेत. गर्दी होणारी अनेक ठिकाणे चालू आहेत. तिथे कोरोनाचा संसर्ग होत नाही आणि तो केवळ गणेशोत्सव मंडळांच्या मंडपातच होतो का ? सरकारच्या दडपशाहीला विरोध केला पाहिजे.