साकीनाका (मुंबई) येथे बलात्कारानंतर महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवला !
बलात्कार पीडितेचा उपचाराच्या वेळी मृत्यू
देहली येथील ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणासारखाच हा निर्घृण प्रकार आहे. महिलांवर अत्याचार आणि बलात्कार करणारे यांना कठोर शिक्षा होत नसल्याने गुन्हेगारांचे फावते आहे, तसेच या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. बलात्कार करणार्यांना कठोर शिक्षा देऊन तिची कार्यवाही त्वरित केल्यासच गुन्हेगारांवर वचक बसेल. – संपादक
मुंबई – येथील साकीनाका परिसरात १० सप्टेंबर या दिवशी बलात्कार झालेल्या पीडित महिलेचा राजावाडी येथील रुग्णालयात मृत्यू झाला. नराधमांनी बलात्कारानंतर तिच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याने रक्तस्राव होऊन ती बेशुद्ध झाली होती. पोलिसांनी तिला राजावाडी रुग्णालयात नेल्यावर तेथे तिच्यावर उपचार चालू होते; परंतु उपचाराच्या वेळी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध घेणे चालू आहे. या घटनेवरून देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबरच्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला साकीनाका येथे खैराना रस्त्यावर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा दूरभाष आला. घटनास्थळी पोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती केले. पोलिसांना या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज हाती लागले असून मोहन चौहान नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या भीषण घटनेमुळे मुंबई हादरली आहे.
#NewsAlert | Maharashtra CM Uddhav Thackeray has urged cops to expedite the investigation in the alleged Saki Naka rape incident; the victim had died earlier in the day. Accused sent to police custody till Sept 21.
Aruneel with details. pic.twitter.com/DSQZm9Ctd5
— TIMES NOW (@TimesNow) September 11, 2021
साकीनाका प्रकरणातील खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !
मुंबई – येथील साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेची गंभीर नोंद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलदगती न्यायालयात (‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात) हा खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ‘गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल’, असे आश्वासन दिले आहे. न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या संदर्भात म्हणाले की, साकीनाका, अमरावती, पुणे, पालघर, नागपूर येथील बलात्काराच्या सर्व घटना या भयानक आहेत. मुंबईत रात्री महिलांना फिरण्यात कधी अडचण येत नाही; परंतु अशा घटनांमुळे मुंबईच्या लौकिकाला धक्का पोचतो आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. ही माणसे इतकी पाशवी कशी असू शकतात ? असा प्रश्न निर्माण करणार्या या घटना आहेत.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या की, ‘सध्या समाजातील पुरुषांमध्ये क्रूरता वाढतांना दिसत आहे. ही क्रूरता का वाढत आहे ?’ (बलात्कार्यांना त्वरित कठोर शिक्षा होत नाही, तसेच समाजाची नीतीमत्ता धर्माचरणाअभावी ढासळत चालली आहे. या घटना समाजाच्या या दु:स्थितीच्या द्योतक आहेत. ‘समाजावर साधनेचा संस्कार करणारे आणि धर्माचरणी राजकारणी देणारे हिंदु राष्ट्र’, हाच या स्थितीवर एकमेव पर्याय आहे, हे जाणा ! – संपादक)