पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका गणेश भक्ताकडून १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण !
पुणे, ११ सप्टेंबर – येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका गणेशभक्ताने विविध प्रकारचे पाचू असलेला, तसेच रेखीव नक्षीकाम केलेला १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीला हा मुकुट घालण्यात आला. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि ‘ट्रस्ट’चे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते मंदिरामध्ये सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. उत्सवकाळातही मंदिर बंद रहाणार असल्याने कार्यकर्ते मंदिरात दर्शनासाठी जाणार नसल्याचा मोठा निर्णय ‘ट्रस्ट’च्या वतीने यंदाही घेण्यात आला आहे.