योग्य उपचार घेतल्यास आत्महत्येच्या विचारांना प्रतिबंध करता येतो ! – आधुनिक वैद्य सुशील गावंडे, मानसोपचारतज्ञ
सध्या १ लाखांमागे १० आत्महत्या !
भौतिक साधनांद्वारे सुख असेल अथवा नसेल, तरीही मनुष्य आत्महत्या करतो, याचे खरे कारण म्हणजे मनुष्याला न मिळणारा खरा आनंद ! हा आनंद मिळवायचा असेल, तर अध्यात्माची कास धरायला हवी. योग, नामजप, ध्यानधारणा, सत्संग आदी आध्यात्मिक साधनेद्वारे व्यक्तीचे नकारात्मक मन सकारात्मक होते आणि आत्महत्येसारखे टोकाचे विचार येत नाहीत. अध्यात्माद्वारे म्हणजे साधना करून मनुष्याला खरा आनंद मिळून त्याची ऐहिक आणि पारलौकिक प्रगती होऊ शकते.
नागपूर – समाजात मानसिक आरोग्यासंबंधी जागृती नाही. कोरोनाच्या पश्चात, तर माणसाच्या सामाजिक वृत्तीला तडा जात आहे. दळणवळणबंदी परिस्थितीमुळे आंतरवैयक्तिक संबंधांचा अभाव निर्माण झाला आहे. तसेच व्यसनाधीनता वाढली आहे. या गोष्टी आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरू शकतात. कोरोनाच्या काळात आत्महत्या टाळण्यासाठी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. योग्य उपचार घेतल्यास आत्महत्येच्या विचारांना आणि पर्यायाने आत्महत्या टाळता येतात, अशी माहिती मानसोपचारतज्ञ आधुनिक वैद्य सुशील गावंडे आणि आधुनिक वैद्य श्रीकांत निंभोरकर यांनी दिली. १० सप्टेंबर या दिवशी ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस’ म्हणून पाळला गेला. त्यानिमित्त ते बोलत होते.
‘योग्य वेळी तज्ञांचा उपदेश घेतला, तर व्यक्तीस आत्महत्येपासून वाचवता येऊ शकते’, असे मत या दोन्ही मानसोपचारतज्ञांनी व्यक्त केले आहे. तज्ञांचा उपदेश, योग्य औषधोपचार आणि समुपदेशन यांमुळे आत्महत्येच्या विचारांवर नियंत्रण मिळवता येते. ‘ईसीटी’ (इलेक्ट्रोकन्व्हलसिव्ह थेरपी) ही नैराश्यातून येणार्या आत्महत्येच्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी तंत्र आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आत्महत्येच्या विचारांवर नियंत्रण मिळवून रुग्णाचा जीव वाचवता येतो. (आधुनिक वैद्यांनी केवळ विज्ञानाच्या उपक्रमांद्वारे आत्महत्या रोखण्याऐवजी त्याच्या जोडीला अध्यात्माची शिकवण म्हणजे धर्मशिक्षण दिल्यास, तर व्यक्ती नक्की आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकते. हिंदु राष्ट्रात मनुष्य साधना करून आनंद प्राप्त करत असल्याने त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येणार नाहीत. – संपादक)
भारतात प्रतिदिन सरासरी ४०० आत्महत्या होतात !
वर्ष २०१९ च्या ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार भारतात प्रतिदिन सरासरी ४०० आत्महत्या होतात. १ लाख लोकसंख्येमागे १० आत्महत्या ही गंभीर गोष्ट आहे. ग्रामीणपेक्षा शहरी भागात आत्महत्या अधिक आहेत. अविवाहित, पौगंडावस्थेतील तरुण आणि बेरोजगार यांतही आत्महत्यांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. कौटुंबिक आणि आर्थिक समस्याही आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्या आहेत. (विज्ञान आत्महत्या रोखू शकत नाही. विज्ञानाला मर्यादा आहेत, हे यातून स्पष्ट होते; मात्र योग्य साधना करणार्या मनुष्याचे आत्मबल वाढत असल्याने तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत नाही ! – संपादक)
योग्य उपचारांती आत्महत्या टाळता येऊ शकते ! – तज्ञ
महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे; मात्र आत्महत्येचा प्रयत्न करण्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. आत्महत्या केलेल्यांपैकी ६० ते ८० टक्के व्यक्तींनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो. असा आत्महत्येचा प्रयत्न केला गेला असेल, तर योग्य उपचारांती आत्महत्या टाळता येऊ शकते. याशिवाय नैराश्य, ‘स्किझोफ्रेनिया’ आणि व्यसनाधीनताही आत्महत्येस कारणीभूत ठरू शकतात.