उत्तरप्रदेश येथून हिंगोली येथे आलेल्या अष्टधातूच्या मूर्तीची स्थापना !

शिवसेना गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम !

शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्थापन केलेली अष्टधातूची मूर्ती

हिंगोली – शहरातील शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उत्तरप्रदेश येथून अष्टधातूची श्री गणेशमूर्ती मागवली होती. १० सप्टेंबर या दिवशी पहाटे ४ वाजता ही मूर्ती येथे आली. या मंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. गेल्या वर्षीपासून मंडळाच्या वतीने पंचधातूच्या मूर्तीची स्थापना करून विसर्जनाच्या वेळी ही मूर्ती जिल्ह्यातील देवस्थानला दिली जाते.

येथील ‘शगुन भांडी भांडार’चे मालक राहुल कानडे ही मूर्ती उपलब्ध करून देतात. यावर्षी अष्टधातूची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय मंडळाचे पदाधिकारी तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक अशोक नाईक यांच्यासह मंडळाने घेतला. त्यानुसार त्यांनी राहुल कानडे यांच्याशी संपर्क साधून मूर्तीसाठी विचारणा केली. त्यावरून उत्तर प्रदेशातील अलीगड येथून ही श्री गणेशमूर्ती मागवण्यात आली.

‘शहरात गणेशमूर्ती आल्यानंतर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मूर्तीचे विधिवत् पूजन केले आहे. ४ फूट उंचीची असलेली अष्टधातूची मूर्ती ८५ किलो वजनाची आहे. ‘कोविड’च्या सर्व नियमांचे पालन करून शहरात मूर्ती स्थापना केली आहे. १० दिवसांनी मूर्तीचे प्रतीकात्मक विसर्जन करून ही मूर्ती हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील संस्थांनला दिली जाणार आहे’, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अशोक नाईक यांनी दिली.