नंदुरबार जिल्ह्यात उपचारांअभावी महिलेचा मृत्यू
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अशी स्थिती असणे, हे सर्वपक्षीय सरकारांना आणि प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक
नंदुरबार – धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात दरड कोसळल्याने तेथील वाहतूक बंद पडली. सिदलीबाई पाडवी या महिलेला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी वाहनाची सोय उपलब्ध करता आली नाही. त्यांचे पती त्यांना खांद्यावरून रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते; मात्र उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. चांदसैली घाटात प्रतिवर्षी दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद होते आणि सहस्रो आदिवासी बांधवांचे जीवन वेठीस धरले जाते. त्यामुळे प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी ‘लोकसंघर्ष मोर्चा’द्वारे करण्यात आली आहे.
चांदसैली येथील सरकारी रुग्णालयाचे उपकेंद्र बंदच !
चांदसैली येथील उपकेंद्रात आधुनिक वैद्य उपस्थित रहात नाहीत. येथील आरोग्य उपकेंद्र नेहमी बंद असते. तसेच येथे कुठल्याही दूरभाष आस्थापनांचे ‘टॉवर’ नसल्याने ‘रेंज’ मिळत नाही. त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावण्यासाठी संपर्कही साधता आला नाही. गेल्या ३ वर्षांपासून चांदसैली घाटाचा कठडा आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्याने त्यावर उपाययोजना काढण्याची ‘लोकसंघर्ष मोर्चा’च्या वतीने प्रशासनाकडे लेखी मागणी करण्यात आली होती; मात्र प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष केले. (तक्रारीकडे दुर्लक्ष करणार्या प्रशासकीय अधिकार्यांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)