१ कोटी ७९ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्राचा देशात विक्रम !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई, १० सप्टेंबर (वार्ता.) – संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी, तसेच त्या लाटेची दाहकता न्यून करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ८ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपर्यंत १४ लाख ३९ सहस्र ८०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण लसीच्या डोसची संख्या ६ कोटी ५५ लाखांवर गेली आहे, तर देशात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे. विक्रमी लसीकरणाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेचे कौतुक करण्यात आले आहे. २१ ऑगस्ट या दिवशी राज्यात ११ लाख ४ सहस्र ४६५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली, ४ सप्टेंबर या दिवशी १२ लाख २७ सहस्र २२४ नागरिकांचे लसीकरण झाले, तर ८ सप्टेंबर या दिवशी राज्यात झालेले लसीकरण हे, या कार्यक्रमातील आजपर्यंतचे सर्वाधिक लसीकरण आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.