शवदाहिनीतील ‘गॅस’ संपल्यामुळे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत ३ दिवस पडून
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्मशानभूमीतील घटना
ठाणे, १० सप्टेंबर (वार्ता.) – भाईंदर (पश्चिम) भागातील भोलानगर येथे मीरा-भाईंदर महानगरपालिकेची स्मशानभूमी आहे. या भागात ही एकमेव स्मशानभूमी असून येथे ‘गॅस’वरील शवदाहिनीत, तसेच लाकडांच्या साहाय्याने अंत्यविधी केले जातात. ‘गॅस’ दाहिनीतील ‘गॅस’ ४ सप्टेंबरच्या रात्री संपल्याने दाहिनीत अंत्यविधीसाठी ठेवलेला मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत राहिला. ३ दिवस हा मृतदेह त्या दाहिनीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडून होता. (हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)
कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यविधी प्रामुख्याने ‘गॅस’ दाहिनीत करण्यात येतात. त्यामुळे ‘गॅस’ दाहिनीच्या देखभाल, दुरुस्तीसह ‘गॅस’ पुरवठ्याकडे महानगरपालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगत पालिकेच्या भोंगळ कारभारासंदर्भात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.