साधकांच्या साधनेची प्रत्येक क्षणी काळजी घेणारे आणि ‘विनम्रता, व्यापकता, प्रीती अन् गुरुदेवांप्रती भाव’ आदी गुणांचा संगम असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !
‘मला ४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी जाण्याची संधी मिळाली. मी तेथे १५ दिवसांसाठी गेले होते. तेव्हा मला सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यांना बसण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला सद्गुरु राजेंद्रदादांची साधकांवर असलेली अपार प्रीती अनुभवायला मिळाली.
देवद आश्रमात जाण्यापूर्वी मला थोडीशी भीती होती. तेथील वातावरणाचा पूर्वानुभव नसल्यामुळे ‘तेथे मला सेवा करणे जमेल का ?’, याविषयी मला आत्मविश्वास नव्हता; परंतु देवद आश्रमात गेल्यावर तेथील साधक आणि संत यांच्याकडून मिळालेल्या प्रेमामुळे ‘मी वेगळ्याच विश्वात आहे’, असे अनुभवले.
१. साधिकांचा अनुभवलेला निरपेक्ष प्रेमभाव
मी आश्रमात पाऊल टाकताक्षणी अनेक साधिकांनी मला प्रेमाने आलिंगन देऊन माझे स्वागत केले.
२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची अनुभवलेली अपार प्रीती आणि सहजता
२ अ. आपुलकीने स्वागत करणे : मी भोजनकक्षात गेल्यावर मला गुरुस्वरूप असलेले सद्गुरु राजेंद्रदादा यांचे दर्शन झाले. त्यांनी नवलाईने आणि आनंदाने माझ्याकडे पाहिले अन् म्हणाले, ‘‘तुम्ही आश्चर्याचा धक्काच दिला. नेहमी आपली रामनाथी आश्रमात एक वर्षाने भेट होते ना !’’(सद्गुरु दादा वर्षातून एकदा, म्हणजे दिवाळीला रामनाथी आश्रमात येतात. तेव्हा माझी त्यांच्याशी भेट होते.)
२ आ. महाप्रसादाच्या वेळी ठेवलेली द्राक्षे स्वतः न घेता ती साधिकेला देणे : एकदा भोजनकक्षात महाप्रसादाच्या वेळी सर्वांना एक वाटी द्राक्षे खाण्यासाठी ठेवली होती. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा द्राक्षे देण्यासाठी मला शोधत होते. मी भोजनकक्षात गेल्यावर तेथील साधकांनी ‘सद्गुरु राजेंद्रदादा तुम्हाला शोधत आहेत’, असे मला सांगितले. मी सद्गुरु दादा बसलेल्या ठिकाणी गेल्यावर ते महाप्रसाद ग्रहण करतांना मध्येच उठले आणि त्यांनी वाटीत द्राक्षे घालून ती वाटी माझ्या हातात दिली. त्यांची ही कृती पाहून माझे डोळे पाणावले. त्यानंतर त्यांनी ‘‘तुमच्यासाठीची वाटीभर द्राक्षेही घ्या हो’’, असे मला प्रेमाने सांगितले.
२ इ. साधकाने सद्गुरु राजेंद्रदादांसाठी सातार्याहून आणलेला खाऊ त्यांनी साधिकेलाही देणे, देतांना तिला तो ओळखण्यास सांगणे आणि १० मिनिटांच्या त्यांच्या सत्संगात तिला पुष्कळ आनंद अन् प्रेम मिळणे : दोन दिवसांनंतर सातारा येथून एक साधक पुष्कळ दिवसांनी देवद आश्रमात आले. त्या साधकाने सद्गुरु दादांना तिखट आणि गोड खाऊ दिला होता. मी सातारा येथील असल्याने सद्गुरु दादांनी मला आवर्जून तो खाऊ खाण्यासाठी बोलावले. ते मला म्हणाले, ‘‘सातारच्या साधकांनी खाऊ दिला आहे. ‘तो कोणता खाऊ आहे ?’, हे तुम्हाला ओळखता येते का पहा.’’ साधकांनी दिलेला तिखट खाऊ मला ओळखता आला नाही. मला तो खाऊ तिखट लागल्यामुळे लगेच सद्गुरु दादांनी त्यांच्याकडे असलेला कंदी पेढा मला दिला आणि तो पेढा ‘सातार्यातील कोणत्या दुकानातील आहे, हे ओळखा’, असे गमतीने विचारले. त्यांच्या या १० मिनिटांच्या सत्संगात देवाने मला पुष्कळ आनंद आणि प्रेम दिले.
२ ई. सद्गुरु दादांच्या कन्येचा, वैदेहीचा भ्रमणभाष आल्यावर साधिकेला तिच्याशी बोलायला सांगून आनंद देणारे सद्गुरु राजेंद्रदादा ! : एकदा मी भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करत असतांना अकस्मात् सद्गुरु दादा आले आणि त्यांनी स्वतःचा भ्रमणभाष मला देऊन बोलायला सांगितले. त्या वेळी ‘भ्रमणभाषवर कोण बोलत आहे ?’, याची मला कल्पना नव्हती. नंतर माझ्या लक्षात आले, ‘वैदेही (सद्गुरु राजेंद्रदादांची कन्या) म्हणजेच माझी मैत्रीण भ्रमणभाषवर बोलत आहे.’ सद्गुरु दादांच्या या कृतीतून ‘आपल्या सहज वागण्यातून इतरांना आनंद कसा देऊ शकतो ?’, हे मला शिकायला मिळाले.
३. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेल्या एका प्रसंगाच्या माध्यमातून सद्गुरु राजेंद्रदादांनी संबंधित साधिकांची साधना करवून घेणे
सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात एकदा मी निवासाला असलेल्या खोलीच्या संदर्भातील एक प्रसंग सांगितला होता. त्या वेळी ‘खोलीतील साधिकेला खोलीच्या संदर्भातील एक सूत्र कसे सांगायचे ?’, असा माझ्या मनात भीडस्तपणाचा विचार होता. नंतर सद्गुरु दादांनी मला ‘तुमच्या समवेत खोलीत कोण रहाते ?’, असे सहज विचारले आणि त्या साधिकेला ‘तुम्ही खोलीत आलेल्या नवीन साधिकेशी (श्रद्धाशी) बोलता ना ?’, असे विचारले. सद्गुरु दादांनी असे विचारल्यानंतर ती साधिका माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली आणि नंतर आमच्या दोघींमधील जवळीक वाढली.
अशा प्रकारे आढाव्यात सांगितलेल्या एका प्रसंगाच्या माध्यमातूनही सद्गुरु दादा संबंधित सर्व साधकांची साधना करून घेतात. तेव्हा मला त्यांच्यातील ‘प्रीती’ आणि ‘व्यापकत्व’ या गुणांचे दर्शन झाले.
४. सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याची वैशिष्ट्ये !
‘सद्गुरु दादा घेत असलेला व्यष्टी साधनेचा आढावा म्हणजे जणू आनंद आणि उत्साह यांचा वर्षाव आहे’, असे वाटते. साधकांचे भावजागृतीचे प्रयत्न अधिकाधिक व्हावेत, अशी त्यांना पुष्कळ तळमळ असते.
४ अ. भाववृद्धीचे प्रयत्न वाढण्यासाठी सद्गुरु राजेंद्रदादांनी सांगितलेली सोपी पद्धत आणि तिच्यामुळे झालेला लाभ
४ अ १. स्वयंसूचना सत्राच्या वेळी प्रत्येक सूचना दिल्यानंतर गुरुपादुकांचे भावपूर्ण स्मरण करणे : सद्गुरु दादांनी सांगितले, ‘‘आपण दिवसभरात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी स्वयंसूचना सत्र करतो. त्यातील एका सत्रामध्ये ३ स्वभावदोषांवर प्रत्येकी ५ वेळा सूचना देतो. प्रत्येक सूचना दिल्यानंतर गुरुपादुकांचे भावपूर्ण स्मरण करायचे. असे केल्याने एक स्वयंसूचना सत्र करतांना १५ वेळा गुरुपादुकांचे स्मरण होते आणि दिवसभरात दहा स्वयंसूचना सत्रे झाली, तर १५० वेळा गुरुपादुकांचे स्मरण होते.
४ अ २. सद्गुरु दादांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंसूचना सत्र केल्याने अंतर्मुखतेत वाढ होणे : सद्गुरु दादांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंसूचना सत्र करतांना मला आनंद मिळाला अन् ‘मी एका वेगळ्याच विश्वात आहे’, असे मला जाणवले. ‘हे स्वयंसूचना सत्र चैतन्य आणि भाव यांच्या स्तरावर होत आहे’, अशी देव मला जाणीव करून देत होता. ‘स्वयंसूचना माझ्या अंतर्मनापर्यंत जाऊन त्या स्वभावदोषावर मात करण्याच्या संदर्भात अंतर्मुखताही वाढत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
माझ्याकडून आधी दिवसभरात केवळ ३ – ४ वेळा भावजागृतीचे प्रयत्न होत होते. सद्गुरु दादांनी सांगितल्याप्रमाणे कृती केल्याने माझे दिवसभरात ७० ते ८० वेळा भावजागृतीचे प्रयत्न चालू झाले.
४ आ. गुरुपादुकांचे स्मरण करण्यासोबतच भाववृद्धीसाठी करावयाचे अन्य भावप्रयोग ! : स्वयंसूचनेच्या सत्राच्या वेळी गुरुपादुकांचे स्मरण करण्यासोबतच त्यांनी अन्य प्रयत्नही करण्यास सांगितले, उदा. ‘आपण श्री गुरुचरणांवर नतमस्तक झालो आहोत आणि त्यांना शरणागतभावाने प्रार्थना करत आहोत. गुरूंनी आपल्या मस्तकावर त्यांचा कृपाशीर्वाद ठेवला आहे आणि ते चैतन्य आपण अनुभवत आहोत.
४ आ १. साधकांनी भावजागृतीचे प्रयत्न केल्याने त्यांना झालेले लाभ ! : ‘भावजागृतीच्या प्रयत्नांत वाढ केल्यावर साधकांना काय लाभ झाला ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्रदादांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगायला सांगितले.
अ. सर्वच साधकांमध्ये भावजागृतीचे प्रयत्न वाढवण्याचा उत्साह निर्माण झाला.
आ. साधकांचे प्रयत्न वाढल्यामुळे अनेक साधकांची सेवेची गती आणि एकाग्रता वाढून त्यांची ४ घंट्यांत होणारी सेवा २ घंट्यांमध्ये होऊ लागली.
४ इ. सद्गुरु दादांनी साधकांच्या मनातील ‘पुष्कळ सेवा असल्यामुळे व्यष्टी साधनेस वेळ मिळत नाही’, असा अयोग्य विचार घालवण्यासाठी ‘देव मला अनेक सेवा का देतो ?’, याविषयी चिंतन लिहिण्यास सांगून त्यांना अंतर्मुख करणे : अनेक साधकांच्या मनात ‘पुष्कळ सेवा असल्यामुळे व्यष्टी साधना करण्यास वेळ मिळत नाही’, असा अयोग्य विचार असतो. साधकांच्या मनातील हा विचार दूर होण्यासाठी सद्गुरु दादांनी त्यांना ‘देव मला अनेक सेवा का देतो ?’, याविषयी चिंतन लिहिण्यास सांगितले. असे चिंतन केल्यामुळे साधक अंतर्मुख होऊ लागले. सद्गुरु दादांनी साधकांना प्रश्न विचारला, ‘देवाला जर ठाऊक आहे की, पुष्कळ सेवा दिल्यामुळे साधकांची साधना होणार नाही, तर ‘देवाने एवढ्या सेवा दिल्या असत्या का ?’ या प्रश्नामुळे साधकांचा व्यष्टी साधनेकडे कल वाढला. ‘केवळ देवाचे साहाय्य घेऊनच आपण देवाचे कार्य करू शकतो’, ही श्रद्धा साधकांमध्ये वृद्धिंगत होण्यास साहाय्य झाले आणि त्यांच्या आनंदातही वाढ झाली.
५. सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि देवद आश्रमातील साधक यांच्यात असलेली कुटुंबभावना !
देवद आश्रमातील या माझ्या १५ दिवसांच्या कालावधीत देवाने मला साधकांमधील प्रेमभाव आणि कुटुंबभावना अनुभवायला दिली. सद्गुरु दादांच्या सहज वावरण्यामुळे आश्रमातील साधकांमध्येही सहजता अन् प्रेमभाव वाढला आहे. त्यामुळेच ‘देवद आश्रम हे एक कुटुंबच आहे’, असे मला जाणवले. आम्ही आश्रमातून निघतांना सद्गुरु दादांसमवेतच अनेक साधकही आमचा निरोप घ्यायला आले होते. अनेक साधक आम्हाला ‘‘पुन्हा लवकर या’’, असेही सांगत होते. ‘साधकांच्या या प्रेमामुळे अल्प कालावधीत देवाने सर्वांविषयी आपोआपच जवळीक वाढवली’, असे मला जाणवले
६. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधिकेला पाठवलेला संदेश आणि त्यातून त्यांची जाणवलेली विनम्रता !
सद्गुरु राजेंद्रदादांनी बाजूची कविता वाचून मला संदेश पाठवला, ‘ताई, तुम्ही चांगली कविता केली आहे. तुम्ही कवितेत लिहिल्याप्रमाणे मी तसे बनण्याचा प्रयत्न करतो. देवद आश्रमातील चैतन्य आणि साधक करत असलेले प्रयत्न यांचा हा परिणाम आहे. तुम्ही समोर आल्यावर ‘श्रद्धा’ वाढवायला हवी’, याची मला जाणीव होत होती. तुमच्या नावात केवढे सामर्थ्य आहे !’
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला पाठवलेल्या या संदेशातून ‘ते सद्गुरु पदावर असूनही किती अंतर्मुख आणि शिकण्याच्या स्थितीत आहेत’, याची जाणीव करून देवाने मला स्वतःच्या साधनेविषयी अंतर्मुख केले.
‘देवा, या लेखातून तू मला पुन्हा एकदा कृतज्ञताभाव वाढवण्याची संधी दिलीस. सद्गुरु राजेंद्रदादा यांच्याविषयी लिहिणे, म्हणजे शब्दांना खरेच मर्यादा आहेत. ‘त्यांचे मार्गदर्शन अंतर्मनातून अनुभवून त्याप्रमाणे कृती करणे तुला अपेक्षित आहे. तूच तशी कृती माझ्याकडून करवून घे’, अशी तुझ्या चरणी संपूर्ण शरणागतभावाने आर्त प्रार्थना आहे.’
– कु. श्रद्धा लोंढे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.२.२०२१)
देवद आश्रम नव्हे, हा तर रामनाथी आश्रमाचे प्रतिरूप भासे ।
देवद आश्रमातून निघतांना सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) आणि आश्रमातील साधक यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून देवाने मला काही ओळी सुचवल्या.
जेथे साक्षात् गुरुदेव सद्गुरु राजेंद्रदादांच्या माध्यमातून वास करती ।
अन्नपूर्णादेवी समवेत सर्व देवता साधकांच्या रूपात दिसती ।। १ ।।
आनंदाची उधळण अखंड जेथे असती ।
अशा या चैतन्यमय वातावरणात सर्वत्र देवा, तूच दिसशी ।। २ ।।
सद्गुरु दादांचे मार्गदर्शन, त्यांचे सहज वावरणे, यांतून भावानंद अनुभवतो ।
साधकांच्या प्रेमळ दृष्टीतून मनाला कुटुंबभावना जाणवते ।। ३ ।।
सद्गुरु दादांच्या सत्संगातून देवा, तू जे काही शिकवलेस ।
त्याची आठवण येते अन् ‘साधनेचा नव्याने प्रारंभ झाला’, असे वाटते ।। ४ ।।
या पंधरा दिवसांत देवा, साधनेचे मर्मच तू शिकवलेस ।
प्रयत्नांच्या माध्यमातून तूच आम्हाला अर्पण करून घेतलेस ।। ५ ।।
क्षणोक्षणी काळजी घेणार्या, क्षणोक्षणी इतरांचा विचार करणार्या ।
पदोपदी इतरांना उत्साह अन् आनंद देणार्या ।
सद्गुरु दादांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अशक्य आहे ।। ६ ।।
देवद अन् रामनाथी आश्रम यांमध्ये अंतर नसे ।
सद्गुरु दादांच्या माध्यमातून गुरुमाऊलींनीच सार्यांना जोडलेले असे ।। ७ ।।
– कु. श्रद्धा लोंढे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |