एकनाथ खडसे यांनी पुणे येथील भूमी खरेदीत अपव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसते ! – ‘ईडी’च्या वतीने न्यायालयात म्हणणे सादर

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्राथमिकदृष्ट्या पहाता भोसरी (जिल्हा पुणे) येथील भूमी खरेदीत अपव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत आहे’, असे निरीक्षण अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’) ९ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात नोंदवले आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असतांना पदाचा अपवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ करून दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की, खडसे हे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत; मात्र हा गुन्हा घडतांना ते भाजपमध्ये होते

काय आहे भोसरी भूमी घोटाळा प्रकरण ?

भाजपचे सरकार असतांना एकनाथ खडसे महसूलमंत्री होते, त्या वेळी त्यांनी भोसरी येथे ३.१ एकर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट खरेदी करण्यासाठी स्वतःच्या पदाचा अपवापर केला आहे, असा आरोप वर्ष २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निवळ ३ कोटी ७० लाख  रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. ‘रेडी रेकनर’ दरापेक्षा पुष्कळ अल्प बाजारमूल्य दाखवून भूखंडाची खरेदी करण्यात आली आहे, असा आरोप त्यांच्यावर आहे.