‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन
कोल्हापूर, १० सप्टेंबर (वार्ता.) – कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा नदी, समुद्र, तलाव आदी ठिकाणी टाकल्या जातात. यामुळे कृत्रिम हौदासाठी खर्च केलेले सर्व पैसे आणि श्रम पूर्णपणे वाया जाते. काही ठिकाणी तथाकथित पर्यावरणवादी संघटना श्री गणेशमूर्ती जमा करतात आणि त्या मूर्ती पुन्हा गणेश मूर्तिकारांनाच विकतात, असेही लक्षात आले आहे. त्यामुळे तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, तसेच श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.
या वेळी शिवसेनेचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’चे सदस्य श्री. प्रमोद सावंत, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. शिवानंद स्वामी, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. नितेश कुलकर्णी उपस्थित होते.
गडहिंग्लज आणि बेळगाव येथेही निवेदन सादर !
१. गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे ९ सप्टेंबर या दिवशी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनंत मुतकेकर आणि उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री दत्ताराम पाटील, सिद्राम कब्बुरे, वामन बिलावर, ओंकार कडूकर आणि शिवप्रसाद कब्बुरे उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असून प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही संबंधितांना सूचना देऊ’, असे सांगितले.
२. बेळगाव येथे ९ सप्टेंबर या दिवशी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुम्मगोळ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्वला गावडे, श्री. सुधीर हेरेकर आणि धर्मप्रेमी श्री. सदानंद मासेकर उपस्थित होते.