६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे रुग्णाईत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भ्रमणभाषद्वारे साधनेविषयी झालेले संभाषण
‘वर्ष २०१६ मध्ये मी ठाणे येथील ‘ज्युपिटर हॉस्पिटल’मध्ये ‘कॅन्सर’च्या ‘मल्टीपल मायलोमा’ आजारावर वैद्यकीय उपचार पूर्ण करून आले होते आणि मी नियमित औषधोपचार घेत होते, तरी मला गेल्या दोन मासांपासून ‘कॅन्सर’चा पूर्वीप्रमाणे तीव्र त्रास होत आहे; म्हणून २९.१०.२०२० या दिवशी गोवा येथील ‘मणिपाल रुग्णालयात’ वैद्यकीय उपचारांसाठी मला तातडीने भरती (ॲडमिट) केले. त्या रात्री रुग्णालयात असतांना माझा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भ्रमणभाषद्वारे पुढील संवाद झाला.
मी : नमस्कार, प.पू. डॉक्टर
परात्पर गुरु डॉ. आठवले : नमस्कार . तुमचा नामजप होतो ना ?
मी : हो डॉक्टर; पण माझा व्यष्टीचा नामजप फारच अल्प होतो; परंतु आपण सांगितलेले समष्टीसाठीचे तीन नामजप आपोआप आणि चांगल्या पद्धतीने होतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : वा ! मग आणखीन चांगले आहे. समष्टी नामजप करणारा साधक देवाला आवडतो; कारण व्यष्टी साधना करणारा स्वार्थी असतो.
मी : हांऽ !
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही दोघेही नेहमी आनंदी कसे असता ? केसरकरही नेहमी हसतमुख असतात.
मी : हो, प.पू. डॉक्टर; पण हे सर्व तुम्हीच आम्हाला शिकवले आहे ना ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो, मी सगळ्यांनाच शिकवले आहे, तरी सगळेच कुठे कृती करतात; पण तुम्ही कृती केली.
(त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टर, आमच्याकडून तुम्हीच कृती करवून घेता. कर्ते-करविते आपणच आहात ना ?’)
परात्पर गुरु डॉ. आठवले (माझ्या समवेत रुग्णालयात असलेले माझे यजमान अधिवक्ता केसरकर यांना उद्देशून) : सौ. केसरकरांच्या प्रकृतीविषयी डॉक्टर काय म्हणाले ?
अधिवक्ता केसरकर : आम्ही आज सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी मणिपाल रुग्णालयात आलो. तेव्हा रुग्णालयातील ‘कॅन्सर’च्या तज्ञ डॉक्टरांशी भेट झाली. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘यांचा कॅन्सरचा आजार पुन्हा चालू झाला आहे. त्यामुळे यांची शारीरिक स्थिती फारच नाजूक झाली आहे, तरी यांना आजच रुग्णालयात भरती करूया. यांच्या लगेच एम्.आर्.आय्.सह अन्य सगळ्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करूया. त्यांना दोन बाटल्या रक्त आणि इतर औषधांसमवेत प्रत्येक आठवड्याला एक, याप्रमाणे एकूण १२ ‘केमो थेरपी’चे उपचार तातडीने चालू करणे आवश्यक आहे. त्यामुळे यांना आजच रुग्णालयात भरती करावे लागेल; म्हणून मी सौ. केसरकर यांना आज दुपारी मणिपाल रुग्णालयात भरती केले आणि यांच्या वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या चालू झाल्या आहेत.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : एवढ्या कठीण प्रसंगांतही तुम्ही दोघे आनंदी असल्याचे दिसते. ‘आपण आलेली परिस्थिती स्वीकारली की, आपल्याला आनंद मिळतो’, हे जीवनात नेहमी लक्षात ठेवा.’
– सौ. प्रमिला केसरकर (वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२०)
कर्करोगावरील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात आणि रामनाथी आश्रमात आल्यावर अनुक्रमे व्यष्टी अन् समष्टी नामजप करतांना सौ. प्रमिला केसरकर यांना आलेल्या अनुभूती
१. रुग्णालयात असतांना आणि रामनाथी आश्रमात परत आल्यावरही १ दिवस व्यष्टी साधनेसाठीचा नामजप सहजतेने होणे
‘३०.११.२०२० या दिवशी मला पणजी (गोवा) येथील ‘मणिपाल रुग्णालया’त कर्करोगावरील वैद्यकीय उपचारांसाठी तिसर्यांदा भरती (ॲडमिट) करण्यात आले. त्या रात्री माझे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भ्रमणभाषद्वारे साधनेविषयी पुढील संभाषण झाले.
मी : नमस्कार, प.पू. डॉक्टर !
परात्पर गुरु डॉ. आठवले : नमस्कार ! तुमचा नामजप होतो ना ?
मी : हो डॉक्टर ! पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर माझ्यावर ‘केमो’च्या संदर्भातील वैद्यकीय उपचार चालू असतांना मला अतिशय त्रास होतो आणि मला धाप लागून मी नियमित करत असलेला समष्टीसाठीचा नामजप करणे मला कठीण जाते; मात्र त्या वेळी माझा व्यष्टी साधनेसाठीचा नामजप चांगल्या पद्धतीने होतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मग असे आहे, तर तुम्ही त्या वेळी केवळ तुमचा व्यष्टी साधनेसाठीचाच नामजप करा. आपण प्रयोग करूया आणि पाहूया, काय होते ते !
त्यानंतर रुग्णालयात माझ्यावर ‘केमो’च्या संदर्भातील वैद्यकीय उपचार चालू असतांना दोन्ही दिवस मी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्यष्टी साधनेसंबंधी नामजप केला आणि तो त्यांच्या कृपेने माझ्याकडून सहजसुलभ झाला.
२. रुग्णालयातून रामनाथी आश्रमात आल्याच्या दुसर्या दिवसापासून समष्टी साधनेसाठीचा नामजप आपोआप आणि सहजसुलभ होणे
मी रुग्णालयातून रामनाथी येथील सनातन आश्रमात परत आल्याच्या दुसर्या (२.१२.२०२० या) दिवशी माझे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भ्रमणभाषद्वारे पुढील संभाषण झाले.
मी : नमस्कार, प.पू. डॉक्टर !
परात्पर गुरु डॉ. आठवले : नमस्कार ! रुग्णालयातून आलात का ? तुमचा नामजप चालू आहे ना ?
मी : हो, प.पू. ! रुग्णालयात ‘केमो’च्या संदर्भातील वैद्यकीय उपचार चालू असतांना दोन्ही दिवस आपण सांगितल्याप्रमाणे माझा व्यष्टी साधनेसाठीचा नामजप सहजसुलभ झाला. त्यानंतर मी आश्रमात आल्यावरही माझ्याकडून तो नामजप एक दिवस सहजसुलभ झाला; मात्र समष्टी साधनेसाठीचा नामजप प्रयत्न करूनही होत नव्हता. पुढे दुसर्या दिवसापासून माझा समष्टी साधनेसाठीचा नामजप आपोआप चालू झाला आणि तो सहजसुलभ होत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : वा ! छान झाले. ही तुमची चांगली अनुभूती आहे.’
– सौ. प्रमिला केसरकर, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (१०.१२.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |