भाद्रपद मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
‘७.९.२०२१ या दिवसापासून भाद्रपद मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, ग्रीष्मऋतू, ज्येष्ठ मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. गौरी आवाहन : भाद्रपद मासात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते. १२.९.२०२१ या दिवशी सकाळी ९.५० नंतर अनुराधा नक्षत्र असल्याने त्यानंतर गौरी आवाहन करावे.
२ आ. श्री बलराम जयंती : भाद्रपद शुक्ल षष्ठीला बलराम जयंती साजरी करतात. ‘मुलांना दीर्घायुष्य आणि समृद्धी लाभावी’, यांसाठी स्त्रिया या दिवशी उपवास करतात. १२.९.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.२१ पर्यंत भाद्रपद शुक्ल षष्ठी तिथी आहे.
२ इ. सूर्यषष्ठी : भाद्रपद शुक्ल षष्ठीला सूर्यनारायणाचे विधीवत् पूजन करतात. श्री सूर्यदेवाला तांब्याच्या कलशाने अर्घ्य द्यावे. या दिवशी अळणी (बिनमिठाचे) अन्न खावे. या व्रताने तेज प्राप्त होते.
२ ई. कार्तिकेय दर्शनाने पापनाश : भाद्रपद शुक्ल षष्ठीला भगवान कार्तिकेयांचे दर्शन घेतल्याने पापनाश होते.
२ उ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १२.९.२०२१ या दिवशी सकाळी ९.५० पर्यंत, १७.९.२०२१ या दिवशी सकाळी ८.०८ पासून उत्तररात्री ३.३६ पर्यंत आणि १८.९.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.२१ पासून दुसर्या दिवशी सकाळी ६.०० पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ऊ. गौरी पूजन : भाद्रपद मासात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन केले जाते. १३.९.२०२१ या दिवशी सकाळी ८.२३ नंतर ज्येष्ठा नक्षत्र असल्याने त्यानंतर गौरी पूजन करावे.
२ ए. अमुक्ता भरणव्रत : भाद्रपद शुक्ल सप्तमीला ‘अमुक्ता भरणव्रत’ करतात. यालाच ‘अमुक्ता भरणव्रत सप्तमी’ किंवा ‘संतान सप्तमी’ असेही म्हणतात. संततीला सौख्य लाभावे, यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामध्ये भगवान शंकर आणि देवी उमा यांची पूजा केली जाते.
२ ऐ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १३.९.२०२१ या दिवशी दुपारी ३.११ पासून उत्तररात्री २.०९ पर्यंत, १६.९.२०२१ या दिवशी रात्री ८.५१ पासून दुसर्या दिवशी सकाळी ८.०८ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ओ. गौरी विसर्जन आणि दोरे घेणे : भाद्रपद मासात मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केले जाते. १४.९.२०२१ या दिवशी सकाळी ७.०५ नंतर मूळ नक्षत्र असल्याने त्यानंतर गौरी विसर्जन करावे. भाद्रपद मासात ज्येष्ठा नक्षत्रापासून पुढे सलग १६ दिवस ज्येष्ठा आणि कनिष्ठा लक्ष्मी भगिनींची पूजा करतात. यासाठी प्रतिदिन एक दोरा पूजेत घेतात; मात्र सध्याच्या काळात ज्येष्ठा नक्षत्रावर १६ दिवसांचे प्रतीक म्हणून १६ गाठी मारलेला तातू (एक प्रकारचा दोरा) पूजेत घेतात आणि दुसर्या दिवशी, म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशी तो दोरा हातात बांधतात. यालाच ‘दोरे घेणे’ असे म्हणतात.
२ औ. अदुःखनवमी : भाद्रपद शुक्ल नवमी तिथीला ‘अदुःखनवमी’ म्हणतात. या दिवशी माता पार्वतीची पूजा करतात. १५.९.२०२१ या दिवशी अदुःखनवमी आहे.
२ अं. परिवर्तिनी एकादशी : भाद्रपद शुक्ल पक्ष एकादशीला ‘परिवर्तिनी एकादशी’ म्हणतात. १७.९.२०२१ या दिवशी परिवर्तिनी एकादशी आहे. इच्छापूर्तीसाठी परिवर्तिनी एकादशीचे व्रत करतात. या दिवशी भगवान श्रीविष्णूचे पूजन करून तुपाचा दिवा लावतात. श्रीविष्णूला तुलसीपत्र अर्पण करतात. एकादशी माहात्म्य आणि श्रीविष्णुसहस्रनाम यांचे वाचन करतात.
२ क. वामन जयंती : भाद्रपद शुक्ल पक्ष एकादशी ही ‘वामन जयंती’ नावाने ओळखली जाते. या दिवशी भगवान श्रीविष्णूने वामनावतार धारण करून बळीराजाला मुक्त केले.
२ ख. शनिप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. शनिवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘शनिप्रदोष’ म्हणतात. १८.९.२०२१ या दिवशी शनिप्रदोष आहे. संतती सुखासाठी आणि जीवनात येणार्या अडचणींच्या निवारणार्थ शनिप्रदोष हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे. शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
२ ग. दधिदान-क्षीरव्रत : भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्राने युक्त द्वादशी तिथीला ‘दधिदान-क्षीरव्रत’ करतात. या दिवशी दधि म्हणजे दही याचा उपयोग करतात. या दिवशी दधि दान करतात. १८.९.२०२१ या दिवशी दधिदान-क्षीरव्रत आहे. या व्रतामध्ये दुधापासून बनलेले आणि दुधामध्ये शिजवलेले पदार्थ वर्ज्य करावेत. या व्रतासाठी दही आणि ताक वर्ज्य नाहीत. या दिवशी विमानारूढ भगवान श्रीधराची पूजा करून अहोरात्र आनंदोत्सव साजरा करतात. ‘या व्रताचे पंचयज्ञासमान फळ मिळते’, असे मानले जाते.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.
(२.९.२०२१)
टीप १ : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो. टीप २ : भद्रा (विष्टी करण), दुर्गाष्टमी, एकादशी, घबाड मुहूर्त, प्रदोष आणि क्षय दिन यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ : वरील सारणीतील शुभ/अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांचे पुढील वचन लक्षात ठेवावे. |
तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |