भारताची भूमिका महत्त्वाची !
संपादकीय
इस्लामी आक्रमकांना पुरून उरलेला भारतच जागतिक आतंकवाद नष्ट करू शकतो !
दोन दशकांपूर्वीचा आजचा दिवस (११ सप्टेंबर २००१) एका धर्मांध हिंसक कृत्याने कलंकित झाला. याच दिवशी अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ येथे जिहादी आक्रमण करण्यात आले होते. या आक्रमणाचा सूत्रधार असलेल्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकमध्ये घुसून ठार केले. यानंतर अमेरिकेच्या या भूमिकेचे काही देशांनी कौतुक केले; आज मात्र तीच अमेरिका अफगाणिस्तानात त्याच धर्माच्या जिहाद्यांकडून पराभूत झाली. जय-पराजयाचे हे चक्र का उलटले ? यातून अन्य देशांनी काय धडा घ्यायचा ? यांचा ऊहापोह करणे आवश्यक आहे; कारण उद्याचे संकट वर्तमानात गर्भित सूचना करत असते. त्या सूचना ओळखून संकटाला तोंड देण्यास सक्षम होण्याची हातोटी भविष्य सुरक्षित करत असते.
आतंकवाद का फोफावत आहे ?
‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ येथे झालेले आक्रमण असो, पॅरिस (फ्रान्स) येथील आक्रमण असो, भारतातील २६/११ चे आक्रमण असो वा काश्मीरमधील हिंदूंचा नरसंहार असो, या घटनांचे मूळ धर्मांधता आहे. जिहादी विचारधारेवर ही आक्रमणे घडत आहेत; मात्र हे सत्य असूनही ते उघडपणे स्वीकारण्याची जगाची सिद्धता नाही. इस्लामी धर्मांधतेविषयी कुणी ‘ब्र’ही काढायला सिद्ध नाही. आज ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’सारख्या परिषदा होतात. हिंदुत्वाविषयी विद्वेषी आणि भ्रामक प्रचार होतो; मात्र वस्तूस्थिती असलेल्या इस्लामी आतंकवादाविषयी चर्चा होत नाही. हा अक्षम्य कानाडोळाच जिहाद पोसण्यास कारणीभूत ठरत आहे. भारतात तर जिहादी आतंकवाद्यांना मोकळे रान मिळाले आहे. जगातील देशांमध्ये भारताला इस्लामी धर्मांधतेची सर्वाधिक झळ बसलेली आहे. ‘निधर्मीपणाची झापडे’ आणि ‘लांगूलचालनाचा राजकीय अजेंडा’, ही यामागील प्रमुख कारणे आहेत. काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांनी ‘देशात मुसलमान कधीही बहुसंख्य होऊ शकत नाहीत’, असे नुकतेच म्हटले आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात धर्मांधांना इस्लामी राजवट आणायची आहे. त्यासाठी स्वधर्मियांची लोकसंख्या वाढवणे, हा धर्मांधांनी अवलंबलेला एक मार्ग आहे. भारतासह जगभरात वाढत असलेली मुसलमानांची लोकसंख्या आणि घटत चाललेली अन्य धर्मियांची लोकसंख्या, हा याचा पुरावा आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी असलेले (मौलाना) दिग्विजय सिंह यांचे हे वक्तव्य ‘जिहादी आतंकवाद सुखेनैव पोसला जातो’ या वाक्याला पुष्टी देणारे आहे. असे राष्ट्रघातकी विचारसरणीचे राजकारणी लोकशाहीत कार्यरत आहेत. भारतात उघडपणे जिहादचे समर्थन करणार्यांचाही भरणा आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी धडधडीतपणे अफगाणिस्तानातील सत्ता बळकावलेल्या तालिबान्यांविषयी सद्भावना व्यक्त करून त्यांनी इस्लामी नियमांच्या आधारावर शासन करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. इस्लामी नियम म्हणजे धर्मांधता, हे त्यांच्या जगभरातील कारवायांमधून स्पष्ट झालेच आहे. अशा जिहादला ‘चांगली व्यवस्था’ मानणारे भारतात एका संवेदनशील राज्याचे कधीकाळी मुख्यमंत्री होते, यात ‘जिहादी आतंकवाद का नष्ट होत नाही ?’ या प्रश्नाचे उत्तर आहे.
आतंकवादातून तिसर्या महायुद्धाची शक्यता ?
अमेरिका हा प्रगत देश आहे; मात्र भूमीवरच्या युद्धनीतीचा अभाव असल्याने अफगाणिस्तानात तालिबान्यांना राजवट आणता आली. अमेरिका हवाई युद्धात पारंगत आहे. भूमीवरील युद्धाचा मात्र अमेरिकेच्या सैन्याला अनुभव नाही. अफगाणिस्तानातील तालिबान्यांना पाकिस्तानी सैन्याने भरीव साहाय्य केले. हे साहाय्य का केले असेल ? धर्मांध मुसलमान, मग ते कोणत्याही देशातील असोत, ‘संपूर्ण जगाला इस्लाममय करणे’, हे त्यांचे समान ध्येय असते. ही आक्रमकता धर्मांधांभोवती केंद्रित असून अन्य धर्मियांना यात लक्ष्य केले जाते. त्यामुळे हे आक्रमण म्हणजे एकप्रकारे धर्मयुद्धच आहे. हेच धर्मयुद्ध येत्या काळात तिसर्या महायुद्धाचे कारण ठरू शकते.
भारत हा एकमेव आधार !
तिसरे महायुद्ध झाल्यास अमेरिकेसारखी जागतिक महासत्ता आतंकवादापासून जगाचे रक्षण करू शकत नाही; कारण अमेरिकेने आतंकवाद्यांविरुद्ध आतापर्यंत केलेल्या कारवाया स्वत:च्या राष्ट्रीय प्रतिशोधासाठी केल्या. जगभरातील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी अमेरिकेने कधी प्रयत्न केले नाहीत, मग याची पाळेमुळे उखडून टाकणार तरी कोण ? जगातील भारत हाच एकमेव देश आहे, ज्याच्यामध्ये आतंकवादाचा नायनाट करण्याची क्षमता आहे. भारताने काही शतकांपासून इस्लामी आक्रमकांचा यशस्वीपणे सामना केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल सैन्याला टक्कर देत उभारलेले हिंदवी स्वराज्य, हे सर्वांसाठी आदर्श असेच होते. अशा विजयाचा वारसा केवळ भारताकडे आहे. यासह भारताचा पाया नीतीमान आहे. त्यामुळे भारत नि:स्वार्थीपणाने आतंकवाद्यांविरुद्ध लढा देऊ शकतो. जिहादी धर्मयुद्धाच्या कह्यात जाऊ पहाणार्या जगाला त्यातून वाचण्यासाठी आवश्यक असलेले तंत्र केवळ भारतियांकडे आहे. नुकतेच ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ‘इस्लामी विचारसरणी आणि त्यातून होणारी हिंसा हा सुरक्षेसाठी प्रमुख धोका आहे’, असे वक्तव्य केले. उशिरा का होईना ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांना ही उपरती झाली. गेल्या अनेक दशकांच्या आतंकवादी अन्याय-अत्याचारापुढे जगातील बहुधा सर्वच देश आता हतबल होत आहेत. त्यामुळे ‘भारताच्या आतंकवादासंदर्भातील भूमिकेवर संपूर्ण जगाचे भवितव्य अवलंबून आहे’, असे म्हटले, तर ते चुकीचे ठरणार नाही. सुदैवाने भारतात राष्ट्रप्रेमी सरकारची सत्ता आहे. भारतच आतंकवादाचा ‘निहंता’ (नष्ट करणारा) होऊ शकतो. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशाला हिंदु राष्ट्र घोषित करायला हवे. भारतीय शौर्य परंपरा पुनरुज्जीवित करायला हवी. असे झाल्यास जिहादी आतंकवाद समूळ नष्ट होईल !