कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींच्या संदर्भातील ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या बंदीच्या आदेशाचे ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून उल्लंघन !
|
मुंबई – कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीं प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम विभाग, पुणे यांनी ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी दिला होता. तसेच लवादाने तत्कालीन शासनाच्या कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणार्या ३ मे २०११ या दिवशीच्या शासन निर्णयावर स्थगिती आणली होती. असे असतांनाही ‘अॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट’, ‘इको गणेशा’ यांसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून (ऑनलाईनच्या माध्यमांतून वस्तूंची खरेदी-विक्री करण्याची सुविधा असणार्या संकेतस्थळांकडून) मोठ्या प्रमाणात कागदी लगद्याच्या मूर्तींची विक्री चालू आहे. हे लवादाच्या न्यायिक आदेशाचे उल्लंघन असून यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढेल. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाच्या न्यायिक आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुणे, संभाजीनगर आणि जळगाव येथे पोलीस तक्रार केली आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी कळवले आहे.
१. वर्ष २०११ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा आदेश काढला होता. माहिती अधिकारात याविषयी विचारणा केली असता ‘पर्यावरण विभाग’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांनी याविषयी ‘कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला नाही’, असे लेखी उत्तर दिले होते. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने याविषयी ‘राष्ट्रीय हरित लवादा’कडे कागदी लगद्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत असल्याची याचिका प्रविष्ट केली होती. यावर लवादाने ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी शासनाच्या या निर्णयावर बेमुदत काळासाठी स्थगिती आणली. तसेच ‘कागदी लगद्याच्या मूर्तींचा प्रचार-प्रसार करू नये’, असा आदेशही दिला होता. त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन करून कागदी लगद्याच्या मूर्तींची विक्री करणे, हा फौजदारी गुन्हा आहे, असे श्री. घनवट यांनी या वेळी सांगितले.
२. संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशांक देशमुख आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयात; पुणे येथे समितीचे श्री. दीपक आगावणे आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ऋषीकेश कामथे यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात; तर जळगाव येथे हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रांतप्रमुख श्री. मोहन तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन तांबट, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता निरंजन चौधरी आणि ह.भ.प. योगेश महाराज कोळी यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत, तसेच जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज प्रविष्ट केले आहेत. या वेळी जळगावचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी या प्रकरणात लक्ष घालून पुढील कार्यवाही करतो, असे आश्वासन दिले.