रेल्वेने प्रवास करतांना अपघात झालेल्या महिलेला रेल्वे पोलिसांकडून तातडीने वैद्यकीय साहाय्य

अशी तत्परता सर्व प्रशासकीय कामकाजात आल्यास व्यवस्था पालटायला वेळ लागणार नाही ! रेल्वे प्रशासनाने अशी तत्परता सर्व कामकाजात आणल्यास रेल्वेच्या कारभाराची प्रतिमा उंचावेल !

मुंबई, १० सप्टेंबर (वार्ता.) – ९ सप्टेंंबर या दिवशी दादर-रत्नागिरी स्पेशल रेल्वेने जात असतांना गाडीत चढत असतांना एक महिला पडली. याविषयी रेल्वे सुरक्षा दलाकडे वैद्यकीय साहाय्य मागितल्यावर रोहा रेल्वेस्थानकावर गाडी थांबली असतांना पोलिसांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने महिलेवर वैद्यकीय उपचार केले.

सुवर्णा अहिरे या महिला दादर रेल्वेस्थानकावर पडल्या असता त्यांच्या पायाला दुखापत झाली. गाडी ठाणे रेल्वेस्थानकावर आल्यावर पायाला वेदना होऊ लागल्यावर त्यांच्या नातेवाइकांनी रेल्वेमधील सुरक्षेसाठी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसाला सांगितल्यावर त्या पोलिसाने याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात दिली. त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर जगताप, पोलीस काळे यांसह अन्य २ पोलिसांनी येऊन महिलेला आवश्यक वैद्यकीय साहाय्य दिले.