ठाणे शहर पोलिसांनी श्री गणेशाची पोलिसाच्या वेशातील प्रतिकृती हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर हटवली !
पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन !
हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नसल्याने देवतेचे मानवीकरण केल्याने पाप लागते, देवतेचा अवमान होतो, हे त्यांना लक्षात येत नाही ! त्यामुळे पोलीस प्रशासनासह सर्वत्र श्री गणेशाच्या चित्राचा वापर विविध कारणांसाठी केला जातो !
ठाणे, १० सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी श्री गणेशाची पोलिसाच्या वेशातील प्रतिकृती ठाणे येथील जांभळी नाका भागातील बाजारपेठेतील रस्त्यावर ठेवण्याचा संतापजनक प्रकार ठाणे शहर पोलिसांनी केला. पोलिसाच्या वेशात असलेल्या या श्री गणेशाच्या प्रतिकृतीच्या हातात प्रबोधनात्मक फलक ठेवण्यात आला होता. हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांनी यास विरोध दर्शवल्यानंतर पोलिसांनी ही प्रतिकृती हटवली; मात्र प्रतिकृती हटवतांना ‘यामध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचे’ सांगत हिंदुद्रोही कृत्याचे समर्थन केले. (अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा अशा प्रकारे वापर पोलिसांनी केला असता का ? याचे त्यांनी उत्तर द्यावे ! – संपादक) याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन दिले असता ‘याविषयी पोलीस आयुक्तांशी संपर्क करून बोलतो’ असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
समितीच्या शिष्टमंडळाने ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना भेटून निवेदन देत ‘या प्रकारामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सांगितले.’ याविषयीचे निवेदन पोलीस महासंचालकांनाही देण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेश उमराणी आणि श्री. सुनील कदम आदींच्या शिष्टमंडळाने ही निवेदने दिली, तर एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना सनातन संस्थेच्या सौ. सविता लेले याही उपस्थित होत्या.