विवाहित असतांना ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये रहाणे अवैध नाही !
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा
समाजव्यवस्था उत्तम आणि सुरळीत रहावी, यासाठी हिंदु धर्माने विवाह संस्थेचे काही नियम ठरवून दिले आहेत. विवाहबाह्य संबंधांना अनैतिक ठरवले होते. त्यामुळेच हा समाज लक्षावधी वर्षांपासून टिकून राहिला आहे, हे लक्षात घ्या !
नवी देहली – विवाहित असतांनाही ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये (विवाह न करता पती-पत्नी यांच्याप्रमाणे रहाण्याची अनैतिक पाश्चात्त्य पद्धत) रहाण्याला पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. विवाहबाह्य संबंधांना ‘व्यभिचार’ ठरवणारे भारतीय दंड संहितेचे कलम ४९७ हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवले होते. त्यामुळे विवाहित असतांना ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये रहाणार्या जोडप्याला सुरक्षा देण्यात काहीच चुकीचे नाही, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
उच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट करण्यात आलेल्या एक याचिकेच्या माध्यमातून ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये रहाणार्या विवाहित असलेल्या जोडीदारांनी सुरक्षेची मागणी केली होती. त्यातील एकाने सांगितले की, त्याची पत्नी आणि कुटुंब यांच्यापासून त्यांच्या जिवाला धोका आहे. त्याच्या पत्नीने पोलीस तक्रार केल्यामुळे पोलिसांकडून त्या ‘लिव्ह इन रिलेशन’च्या जोडप्याला सातत्याने त्रास देण्यात आहे. याप्रकरणी सुनावणी करतांना न्यायालयाने हा निवाडा दिला. तसेच न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशन’मधील जोडप्याला सुरक्षा पुरवण्यात यावी, असा आदेश पंजाब पोलिसांना दिला.
यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणामध्ये ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये रहात असणार्यांमध्ये एक जण विवाहित असेल, तर त्यांना सुरक्षा दिली जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले की, ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचा सन्मान करतात; परंतु त्याच्याशी ते सहमत नाहीत. न्यायालयाने म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच कलम ४९७ ला अवैध म्हटले आहे.