श्री गणेशचतुर्थीचा सण आनंदाचा । जाणूनी धर्मशास्त्र कृपाशीर्वाद मिळवू श्री गणेशाचा ॥
नवीन मूर्तीचे प्रयोजन आणि व्रत !
प्रत्येक हिंदु गृहस्थाच्या घरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देवघर हे असतेच. देवघरात अल्प-अधिक संख्येने देवतांची छायाचित्रे असली, तरी सर्वांच्या देवघरात श्री गणेशाचे छायाचित्र अथवा मूर्ती ही असतेच ! प्रतिदिन देवपूजा करतांना त्या श्री गणेशाच्या छायाचित्राचेही पूजन होतच असतेे. यामुळे मग काही जणांंना प्रश्न पडतो की, आम्ही प्रतिदिनच श्री गणेशाच्या छायाचित्राचेे पूजन करत असतांनासुद्धा श्री गणेशचतुर्थीला मात्र गणपतीची वेगळी मूर्ती का आणायची ?
सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की, श्री गणेश हे तत्त्व आहे. त्याचे छायाचित्र हे तत्त्व आकृष्ट करून घेणारे प्रतीक आहे. त्या प्रतीकाचे पूजन करणे, म्हणजे त्या तत्त्वाचे आवाहन करणे. अशा प्रतीकाचे पूजन केल्याने उपासकाला त्या तत्त्वाचा अधिक लाभ होतो. असे असले तरी, श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशलहरी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात सर्वाधिक शक्ती येईल. अधिक शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा पुढे वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते. याचे कारण म्हणजे त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात; म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात.
श्री गणेशमूर्ती घरी आणण्याची पद्धत
श्री गणेशचतुर्थीसाठी श्री गणेशाची मूर्ती आणणार्यांनी ‘केवळ काही दिवसांसाठी घरी येणार्या अतिथीला आणत आहोत’ एवढाच विचार न ठेवता ‘प्रत्यक्ष देवतेला घरी आणत आहोत’, असा भाव ठेवून त्या संबंधीच्या सर्व कृती करायला हव्यात. या कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य, म्हणजेच उपासकाला पोषक आणि सर्वांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक अशा असाव्यात. जी व्यक्ती मूर्ती स्वत:च्या हातात धरणार आहे, तिने टोपी घालणे आवश्यक आहे. श्री गणेशमूर्ती आणतांना ती पाटावर ठेवावी. मूर्तीचे मुख मूर्ती हातात धरणार्याच्या दिशेने ठेवावे. मूर्ती स्वच्छ रेशमी अथवा सुती वस्त्राने झाकावी. मूर्ती घराकडे नेतांना वाटेत श्री गणेशाचा जयजयकार करावा. घराच्या दारात पोचल्यानंतर मूर्तीचे मुख घराच्या दिशेने करून मूर्तीवरील वस्त्र बाजूला करावे. त्यानंतर ज्याच्या हातात मूर्ती आहे, त्याच्या पायांवर घरातील सुवासिनी स्त्रीने पाणी घालावे. नंतर दूध घालावे. त्यानंतर मूर्तीचे औक्षण करावे. मूर्तीला तिच्या नियोजित स्थानी ठेवण्याआधी तेथे थोडे तांदूळ घालावेत. त्यावर मूर्ती ठेवावी.
श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व
विघ्नांचे हरण करणार्या गणराया, धर्माचरण आणि धर्मकार्य यांतील अडथळे दूर कर, अशी तुझ्या चरणी प्रार्थना.
विनाशकारक, तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत अधिक प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता अधिक असते. त्या तीव्रतेच्या काळात, म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता न्यून (कमी) व्हायला साहाय्य होते. श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.
हरितालिका
१. तिथी : भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया
२. इतिहास आणि उद्देश : पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.
३. व्रत करण्याची पद्धत : माता पार्वतीने ‘भगवान शिवाची वर रूपाने प्राप्ती व्हावी’ म्हणून हे व्रत केले होते. ‘सुयोग्य पती मिळावा’, यासाठी कुमारिका आणि ‘मिळालेले सौभाग्य अखंड रहावे’, यासाठी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशी करतात. या व्रतामध्ये महेश्वर म्हणजे भगवान शिव आणि उमा म्हणजे पार्वती यांच्या मूर्तींची स्थापना करून त्यांचे यथाशक्ती पूजन करतात. हरितालिका पूजनासाठी सर्वप्रथम स्त्रिया आचमन, प्राणायाम करून देशकालकथन करतात. त्यानंतर
मम उमामहेश्वरसायुज्यसिद्धये हरितालिकाव्रतम् अहं करिष्ये ।
म्हणजे ‘श्री उमामहेश्वर यांच्या कृपेने सायुज्य मुक्ती प्राप्त होण्यासाठी मी हे हरितालिका व्रत करत आहे’, असा संकल्प करतात. सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंताशी एकरूप होणे !
४. हरितालिका व्रतातील भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मूर्तींची स्थापना अन् त्यांचे पूजन : या दिवशी स्त्रिया नदीच्या अथवा उपलब्धतेनुसार वहात्या अथवा शुद्ध जलस्रोताच्या ठिकाणी जाऊन तेथील वाळू घरी घेऊन येतात. घरात पूजेसाठीच्या चौरंगावर या वाळूची शिवपिंड बनवतात. हल्ली गावांतून आणि मोठ्या शहरांतून शिवलिंगासह देवी पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्तीही उपलब्ध असतात. सखी-पार्वतीच्या मूर्ती चौरंगावर स्थापित करून त्यांचे पूजन करतात. हरितालिका पूजनात बेल, आघाडा, पारिजात, करवीर, अशोक अशा सोळा प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वहातात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र’)
ऋषिपंचमी
१. तिथी : भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमी
२. ऋषि : कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षि.
३. उद्देश
अ. ‘ज्या ऋषींनी स्वत:च्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखवली आहे, त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते.’
आ. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने, तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही अल्प होतो. (पुरुषांवर होणारा परिणाम क्षौरादी प्रायश्चित्त कर्माने आणि वास्तूवर होणारा परिणाम उदकशांतीने अल्प होतो.)
४. व्रत करण्याची पद्धत
अ. स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत.
आ. अंंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करावा.
इ. पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्या ठेवून कश्यपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन करावे.
ई. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.
उ. दुसर्या दिवशी कश्यपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे. १२ वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र’)