(म्हणे) ‘तमिळनाडूतील मंदिरातील सोने बँकेत ठेवून त्यातून येणार्या व्याजाची रक्कम मंदिरांच्या पायाभूत सुविधांसाठी वापरली जाईल !’ पी.के. सेकरबाबू
२ सहस्र किलो सोन्याचे दागिने वितळवण्यात येणार !
- तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजे द्रविड प्रगती संघ) सरकार सत्तेत असतांना आणखी वेगळे काय होणार ? मंदिरांमध्ये अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांचे काय करायचे, हे ठरवण्याचा अधिकार हिंदूंच्या संतांना आणि धर्माधिकारी यांना आहे; मात्र मंदिरे सरकारच्या कह्यात असल्यामुळे असा हिंदुद्रोही निर्णय घेतला जात आहे. – संपादक
- ‘मशिदी आणि चर्च यांचे सरकारीकरण करून त्यांच्या पैसा पायाभूत सुविधांसाठी वापरण्याचा विचार धर्मनिरपेक्ष सरकारकडून का केला जात नाही ?’ या प्रश्नाचे उत्तर द्रमुक सरकार देणार का ?- संपादक
चेन्नई – तमिळनाडूमधील ‘हिंदु रिलिजीअस अँड चॅरिटेबल एन्डोवमेंट’ (हिंदु धार्मिक आणि धर्मादाय) विभाग हिंदूंच्या मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणारे छोटे दागिने सोन्याच्या कांड्यांमध्ये परिवर्तित करून त्या कांड्या बँकेत जमा करणार आहे. हे दागिने बँकेत ठेवून मंदिरांचे विकास प्रकल्प आणि मंदिरांच्या कल्याणार्थ इतर योजनांसाठी निधी उभारला जाणार आहे. सदर प्रक्रिया करण्यासाठी उच्च न्यायालयातील निवृत्त अधिकार्याच्या नेतृत्वाखाली ३ विभागीय समित्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती या खात्याचे मंत्री पी.के. सेकर बाबू यांनी नुकतीच विधानसभेत दिली.
Tamil Nadu: Revenue from gold will be used to build temple infrastructure, says minister P K Sekar Babu https://t.co/ZUm2JWVpFv
— TOIChennai (@TOIChennai) September 5, 2021
१. सेकर बाबू म्हणाले की, हे दागिने गेली १० वर्षे मंदिराच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात पडून आहेत. हे दागिने वितळवून त्यांच्या सोन्याच्या कांड्या करण्यासाठी मुंबई येथील सरकारी ‘रिफायनरी’मध्ये पाठवण्यापूर्वी त्यातील मौल्यवान रत्ने आणि खडे काढून ठेवण्यात येतील. त्यानंतर व्याजाच्या रकमेत वृद्धी करण्यासाठी हे दागिने बँकेत ठेवण्यात येतील.
२. याविषयी धर्मादाय विभागातील एक जेष्ठ अधिकारी म्हणाले, ‘‘जवळजवळ २ सहस्र किलो सोने वितळवून त्याच्या सोन्याच्या कांड्या करण्यात येतील. या विभागाकडून वर्ष १९७८ ते २०१० या कालावधीत सदर प्रक्रिया करण्यात येत होती. त्यानंतर अण्णाद्रमुक (अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) पक्षाने ही प्रक्रिया बंद केली होती. येत्या २ आठवड्यांत पडताळणी करणारे अधिकारी सोन्याच्या कांड्या सिद्ध करण्यासाठी वापरण्यात येणार्या सोन्याच्या साठ्याची पडताळणी करतील. या पडताळणीचे चित्रीकरण करण्यात येणार असून मंदिराच्या आवारातील एल्.ई.डी. स्क्रीनवर त्याचे प्रक्षेपण करण्यात येईल. तसेच विभागाच्या संकेतस्थळावर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. हे सोने बँकेत ठेवल्यावर येणार्या व्याजाची रक्कम सर्व प्रमुख मंदिरांमध्ये भक्तांना पायाभूत सुविधा देण्यासाठी वापरली जाईल.’’