विद्याधिपतीला साकडे !
आज श्री गणेशचतुर्थी ! सत्ययुगात १० हस्त असणार्या आणि सिंह वाहन असणार्या श्री गणेशाने राक्षसांचा वध केला. त्रेतायुगात सिंधु दैत्याचा, द्वापरयुगात सिंदुरासुराचा वध केला आणि कलियुगातील त्याचा धूम्रवर्णांकित अवतारही दुर्जनांचा नाश करणार आहे. येणार्या काळात होणार्या महाभयंकर तिसर्या महायुद्धापूर्वी वैचारिक शीतयुद्धाने जग ढवळून निघाले आहे. ‘हे वैचारिक युद्ध या मुख्य युद्धाचा गाभा कसे ठरणार आहे ?’, ते अल्पांशाने तरी समजून घेतले पाहिजे.
ज्ञानगंगेला ग्रहण !
‘सत्ययुगापासून द्वापरयुगाच्या शेवटापर्यंत वेद केवळ मौखिक परंपरेने जपले गेले’, हीच मोठी अद्वितीय गोष्ट आहे. ‘ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि’ अशा (ब्रह्माचे) ज्ञान आणि (ऐहिक) विज्ञान यांना व्यापून राहिलेला श्री गणेश हिंदूंच्या आराधनेतील प्रथम दैवत आहे; ज्याचे तत्त्व आजच्या दिवशी सहस्र पटींने कार्यरत आहे. श्री गणेश साक्षात् ज्यांचा लेखनिक झाला आहे, ते जगातील सर्व ज्ञान उच्छिष्ट केलेले, वेदांचे संकलन करणारे व्यास या भूमीतील आहेत. आदी शंकराचार्यांच्या काळात अतिशय नीतीमत्तेने अतिशय उच्च दर्जाच्या ‘धर्मज्ञान’चर्चा होत. अशी महन्मंगल ज्ञानपरंपरा असलेल्या आपल्या देशात इस्लामी आक्रमकांनी तक्षशिलादी विद्यापिठे भस्मसात् केली आणि येथील अद्वितीय अशा ज्ञानगंगेला ग्रहण लागायला आरंभ झाला. त्यानंतर १८०० च्या कालखंडात इंग्रजांनी गुरुकुले नष्ट करून संपूर्ण भारताचा धर्मज्ञानाचा स्रोतच बंद करून या देशाच्या संस्कृतीवर कधीही भरून न निघणारा वज्राघात केला !
१८ व्या शतकात ब्रिटनमध्ये भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे, भारतातील हिंदु धर्मग्रंथांचे चुकीचे अर्थ लावून त्यासाठी हिंदूंना ‘त्यांचा धर्म कसा तुच्छ आहे ?’, हे सांगणे यासाठी नियोजनबद्ध काम कोट्यवधी रुपये खर्चून केले गेले. त्यासाठी तत्कालीन ब्रिटीश विद्यापिठांत हिंदु धर्म उद्ध्वस्त करण्याच्या योजना आखणारे प्राध्यापक नेमले गेले. या पाश्चात्त्य अभ्यासकांनी वेद, उपनिषदे, पुराणे, महाभारत आदी ग्रंथांतील गोष्टींचे अत्यंत विपरीत आणि हीन अर्थ काढून भारतीय बुद्धीवाद्यांमध्ये पसरवले. ‘राधा-कृष्णाचे प्रेम’, ‘श्रीकृष्णाच्या १६ सहस्र स्त्रिया’ किंवा ‘द्रौपदीचे पाच पती’ यांविषयी चुकीचे अर्थ पसरवणे चालू झाले. याच काळात मार्क्सवादी विचारसरणीही भारतात आली आणि १९ व्या शतकातील क्रांतीकारकांसह बरेच बुद्धीवादी त्याने प्रभावित झाले. याच मार्क्सवाद्यांनी ब्रिटिशांची ‘री’ ओढून ‘आर्य बाहेरचे, द्रविड इथले’, ‘उच्चवर्णीय संस्कृतीने बहुजनांवर अन्याय केला’ आदी विचारधारा पसरवून उच्चवर्णियांविषयीचा द्वेष वाढवण्यास चालना दिली. यातूनच दक्षिण भारतात रावणाचे उदात्तीकरण झाले. पुढे ६० च्या दशकात त्याची परिणती विद्रोही साहित्यिकांची निर्मिती होण्यात झाली. ‘रामाने शंबुकाला मारले’, ‘एकलव्यावर अन्याय झाला’ अशा हिंदुद्वेषी विचारधारा पसरवणे चालू झाले. पुढच्या काळात ‘रामदासस्वामी शिवरायांचे गुरु नाहीत’ यासारखे विचार हा याच द्वेषाचा भाग आहे. भारतात धर्म आणि राष्ट्र यांच्याशी संबंधित साहित्य आणि कला यांची निर्मिती बंद होऊन ‘प्रेम’ हाच विषय केंद्रीभूत होऊन चित्रपट आणि साहित्य निर्माण झाले.
साम्यवादी आणि धर्मांध यांची अभद्र युती
नेहरू शासनाच्या काळातच साम्यवादी आणि धर्मांध यांच्यातील वैचारिक युती भारतात पूर्ण घट्ट झाली. संस्कृतला ‘मागासलेली’ संबोधणे आणि मुसलमानांचे तुष्टीकरण अन् उदात्तीकरण करण्याचे काम नेहरू सरकारने इमानेइतबारे केले. ‘या देशावर मोगलांनी राज्य केले’ असे पाठ्यक्रम निर्माण करून बाबर, अकबर, टिपू आदी शत्रूंचे उदात्तीकरण केले. त्याचाच परिणाम पुढे देशभरात आतंकवादाचे सावट, विविध जिहाद निर्माण होणे यांत झाला. शेकडो शूर हिंदु राजांची नावे आणि शौर्य झाकून हिंदूंना अहिंसेच्या विचाराने षंढ बनवण्यात आले. नक्षलवाद्यांची निर्मिती ही साम्यवाद्यांची देणगी आहे. नक्षलवाद्यांना चीन, रशिया येथून, ख्रिस्त्यांना अमेरिका आणि अन्य ख्रिस्ती राष्ट्रांतून, तर मोहल्ल्यात निर्माण झालेल्या छुप्या आतंकवाद्यांच्या म्होरक्यांना इस्लामी देशांतून पैसा येतो. साम्यवाद्यांनी प्राध्यापक, पत्रकार, साहित्यिक असे वैचारिक माध्यम निवडले. ख्रिस्त्यांनी रुग्णालये, शाळा आणि प्रार्थनास्थळांचे, तर आतंकी धर्मांधांनी चित्रपट, कला अन् दहशत बसवणे अशी माध्यमे निवडली. आतंकी धर्मांध आणि साम्यवादी यांच्या युतीचा एक मोठा आघात ‘जे.एन्.यू.’तील ‘टुकडे गँग’च्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष देशासमोर आला. या सर्वांच्या माध्यमातून राष्ट्रभक्त आणि देवभक्त हिंदु कधी भरकटला गेला, कधी फसवला गेला, कधी पोळला गेला, कधी उद्ध्वस्त झाला; पण तरीही तो जिवंत राहिला ! होरपळल्यामुळे आता त्याचा धर्माभिमान जागृत होत आहे !
अमेरिकेचा हिंदुद्वेष !
आज अमेरिकेसह जगातील विविध विद्यापिठांतील, आयोजकांचे नाव नसलेल्या ‘जागतिक हिंदुत्वाचे उच्चाटन’ या परिषदेत हिंदुद्वेषींचे विचार ऐकण्यासाठी ७०० विद्यार्थी आणि ४० विद्यापिठे, श्री गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर आणि ‘९/११’ ची वेळ साधून पुढे येतात तेव्हा भारतासह अमेरिकेतील हिंदू जागृत होत आहेत, हा एक त्यातल्या त्यात आशेचा किरण आहे. ब्रिटनप्रमाणेच अमेरिकी विद्यापिठांतून नियोजनबद्धरित्या गेल्या काही वर्षांत हिंदुद्वेषी विचारसरणीचे प्राध्यापक आणि विद्यार्थी निर्माण करण्यासाठी अन् त्यांनी भारतातही तसे विचार पसरवण्यासाठी निधी देण्यात आला. साम्यवादी आणि वैचारिक आतंकवादी यांच्या या आंतरराष्ट्रीय युतीला टक्कर देण्यासह भारतासह जागतिक स्तरावर एक वैचारिक उलथापालथ चालू झाली आहे. १८ विद्यांचा अधिपती असलेल्या विद्याधिपती विघ्नहर्त्या श्री गणेशाला हेच साकडे या निमित्ताने घालायचे आहे. ‘हे गणराया, या वैचारिक आतंकवादाशी लढण्यासाठी तूच आम्हाला बळ आणि शक्ती दे. तूच आम्हाला धैर्य अन् ज्ञान दे अन् हे विघ्न दूर कर !’