अफगाणिस्तानप्रश्नी अमेरिका, रशिया आणि भारत यांच्यात भारतामध्ये चर्चा
नवी देहली – भारताने अफगाणिस्तानच्या प्रश्नावर अमेरिका आणि रशिया यांना एकत्र आणले आहे. भारतीय प्रयत्नांमुळे अमेरिकी गुप्तचर संघटना सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाय पत्रूशेव्ह यांना एकाच वेळी नवी देहलीमध्ये बोलावण्यात आले आहे. याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश म्हटले जात आहे. २४ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात दूरभाषवरून चर्चा झाली होती. त्याच्या पुढील चर्चेसाठी म्हणून पत्रूशेव्ह यांचा भारत दौरा आहे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. पत्रूशेव्ह ८ सप्टेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भेटले.