गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सांस्कृतिक आघाडी जिल्हाप्रमुख ओंकार शुक्ल यांना ९ ते २० सप्टेंबर या कालावधीत सांगली महापालिका क्षेत्रात प्रवेश बंदीची नोटीस !
मिरज, ८ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या कार्यकाळात पोलिसांसह समाजातील प्रत्येक घटकांना साहाय्य करणारे भाजपचे सांस्कृतिक आघाडी जिल्हाप्रमुख आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. ओंकार शुक्ल यांना ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून १४४ अन्वये ९ ते २० सप्टेंबर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात प्रवेश बंदी आदेशाची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीत त्यांच्यावर मिरज शहर पोलीस वर्ष २००९ आणि वर्ष २०१९ ला दोन गुन्हे नोंद असल्याचे नमूद करून गणेशोत्सव कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून कार्यवाही प्रस्तावित केली आहे, असे नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात खुलासा करण्यासाठी ९ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता मिरज येथील प्रांत कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगितले आहे.
पोलीस प्रशासनाकडून सूडबुद्धीने कारवाई ! – ओंकार शुक्ल
या संदर्भात श्री. ओंकार शुक्ल म्हणाले, ‘‘मला आलेली नोटीस पूर्णत: चुकीची असून ही कारवाई पोलीस प्रशासनाकडून सूडबुद्धीने करण्यात आली आहे. या कारवाईचा मी निषेध करतो. समाजात आज अवैध धंदेवाले, तसेच अन्य गुन्हेगार मोकाट असून सामाजिक कार्य करणारे, हिंदुत्वाचे काम करणारे यांना हद्दपारीच्या नोटिसा दिल्या जात आहेत. यामागील प्रशासनाचा नेमका हेतू काय ? वर्ष २००९ ते २०१९ या १० वर्षांच्या कालावधीत मला कधीही अशा प्रकारची नोटीस आली नाही; मग अचानक आताच का ? महाविकास आघाडीचा सूडबुद्धीचा हा कारभार आहे !’’